Buldhana Rape Case: नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, बुलढाणा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीसह दोघींना अटक
Representational Image (Photo Credits: Pixabay)

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर (Malkapur) शहरात एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार (Buldhana Rape Case) झाल्याची घटना पुढे आली आहे. नग्न फोटो (Nude Photos) व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी या मुलीवर वारंवार बलात्कार (Rape ) करत असल्याची माहिती आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी आणि त्याला सहकार्य करणाऱ्या दोन मुलींना ताब्यात घेतले आहे. नग्न फोटो व्हायरल करेन तसेच ते फोटो तुझ्या आई-वडीलांनाही दाखवेन अशी धमकी देऊन आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत असे.

आरोपी पीडितेला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देत असे. तो तिला केव्हाही कुठेही बोलवत असे. तिथे तो पीडितेच्या इच्छे विरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध ठेवत असे. आरोपीचा त्रास सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याने पीडितेने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यासोबतच आरोपीस अटक करणाऱ्या दोन मुलींनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा, बुलढाणा: रात्रीच्या सुमारास प्रेयसीच्या घरात घुसणे एका प्रियकराला पडले महागात)

प्राप्त माहितीनुसार, भूषण गजानन बोरसे असे आरोपीचे नाव आहे. तो 30 वर्षांचा आहे. बुलढाणा पोलीसांनी भारतीय दंड संहिता कलम कलम 376(2) (N), 354 आ (i), 506, 34 आयपीसी सहकलम 4 बा.लै.अ.सं. अधिनियम 2012 अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

महाराष्ट्रात काही काळापासून बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पहायाल मिळत आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने समाजातून चिंता व्यक्त केली जात आहे. नुकतेच पुणे, साकिनाका बलात्कार प्रकरण पुढे आले. ज्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला. पोलिसांनीही तातडीने आरोपींना अटक केली. असे असले तरी महिलांची सुरक्षा हा मुद्दा मात्र अशा घनटांमुळे वारंवार पुढे येत आहे. आरोपीस तातडीने अटक करुन शिक्षा देण्याची मागणी अशा प्रकरणांतर वाढते. मात्र, काही दिवस गेले की समाजमन अशा घटना विसरून जाते. पुन्हा काही दिवसांनी अशी घटना घडली की महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे येतो.