Palghar: धक्कादायक! पालघरमध्ये 60 वर्षीय ऑटो रिक्षा चालकालचा मृतदेह पुरल्यानंतर सापडला जिवंत; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Palghar: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात (Palghar District) अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक 60 वर्षीय ऑटो रिक्षा चालक (Auto Rickshaw Driver) ज्याला त्याच्या कुटुंबाने मृत समजले होते आणि त्याचे दफन केले होते, तो जिवंत सापडला आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. हा रिक्षा चालक एका पडक्या घरात घरात राहत असल्याचे आढळून आले असून त्याच्या मित्रासोबतच्या गप्पांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कुटुंबाने दफन केलेल्या मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 29 जानेवारी रोजी बोईसर आणि पालघर स्थानकांदरम्यान रुळ ओलांडताना एका अज्ञात व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता.

पालघरमधील गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सोशल मीडियावर मृताची छायाचित्रे प्रसारित केली होती. जीआरपीचे निरीक्षक नरेश रणधीर यांनी सांगितले की, पालघरमधील एका व्यक्तीने जीआरपीशी संपर्क साधला आणि दावा केला की मृत हा त्याचा भाऊ रफिक शेख आहे, जो दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. ज्यासाठी कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. (हेही वाचा - Pune Shocker: पुण्यात आईने नवजात मुलीला फेकलं वाहत्या कालव्यात; असा उघड झाला अपहरणाचा बनाव)

या दाव्यानंतर, पालघर जीआरपीने केरळमध्ये असलेल्या मृत व्यक्तीच्या पत्नीशी संपर्क साधला. अधिकाऱ्याने सांगितले की, ती पालघरला आली आणि मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे त्यांनी सांगितले.

रविवारी शेख यांच्या मित्राने अनौपचारिकपणे शेखला फोन केला असता त्यांना धक्काच बसला. अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांमध्ये व्हिडिओ कॉल झाला. दरम्यान शेख यांनी त्याच्या मित्राला आपण ठीक असल्याचे सांगितले. ही चॅट क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याची माहिती रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांना देण्यात आली. शेख यांच्याशी संपर्क साधून घडामोडीची माहिती पोलिसांना दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शेखने काही महिन्यांपूर्वी आपले घर सोडले होते आणि तो पालघरमधील सफाळा येथे एका पडक्या घरात राहायला गेला होता. ते पुढे म्हणाले की, कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली असून सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर तो त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. शेख जिवंत असल्याची माहिती नंतर पोलिसांना मिळाली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिस आता अज्ञात मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.