गेल्या काही वर्षांमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा (Mumbai) चेहरा मोहरा फारच बदलला आहे. सध्या मेट्रो प्रकल्पानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने मॅनहोल (Manhole) म्हणजे नाल्यांची सफाई करण्यासाठी रोबोटिक मशीन (Robotic Machines) उपलब्ध करून दिले आहेत. बुधवारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने, कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) कार्यक्रमांतर्गत नागरी संस्थेला एम-वेस्ट वॉर्ड (चेंबूर) साठी अशा दोन मशीन दिल्या. बीपीसीएल प्रांगणात याची यशस्वी पायलट चाचणी पार पडल्यावर, एम-वेस्ट प्रभागातील सहाय्यक मनपा आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे त्या सोपवण्यात आल्या.
या रोबोट्समध्ये प्रत्येकी तीन कॅमेरे, इन्फ्रा-रेड उपकरणे आणि मॅनहोलच्या आत वायू शोधण्याची क्षमता आहे. हे रोबोट 8 मीटर खोलवर पोहोचू शकतात. एमसीजीएम एम-वेस्ट वार्ड मॅनहोलची साफसफाई करणाऱ्या कामगारांना हा रोबोट कसा वापरायचा याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशा रोबोट्समुळे मॅनहॉलची मॅन्युअल साफसफाई करण्याची समस्या दूर होणार आहे. तसेच गटारांची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्या आरोग्याचा समस्या उद्भवतात त्याही यामुळे टाळता येऊ शकणार आहेत. ज्यामुळे आरोग्याचा धोका कमी करण्यात मदत होईल. हे कर्मचारी दिवसागणित अनेक प्रकारची घाण हाताळतात, आता हे काम रोबोट करणार आहे.
आता अशा कर्मचाऱ्यांना मॅनहॉल स्वच्छ करताना, धोकादायक असलेल्या मिथेन आणि हायड्रोजन सल्फाइड सारख्या हानिकारक वायूंचा सामना करावा लागणार नाही. रोबोटिक मॅनहोल साफसफाईचे तीन फायदे आहेत, पहिले म्हणजे मॅनहोल साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा, दुसरे त्यांचे आरोग्य आणि तिसरे म्हणजे साफसफाईचा वेग. रोबोटिक मशीन हे जलदगतीने सफाई करेल, ज्याचा फायदा प्रशासनासह नागरिकांना होणार आहे.