Raosaheb Danve: अगामी तीन महिन्यात महाविकास आघाडी सरकार पडणार, अन् भाजपचे सरकार येणार; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा खळबळजनक दावा
Raosaheb Danve and Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन होऊन 1 वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. महाराष्ट्राचे सरकार केवळ 5 वर्ष नव्हेतर पुढील अनेक वर्ष चालेल, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहे. दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्य सरकारविरोधात तुफान फटकेबाजी केली. एकमेकांचे कधी तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल, असा खळबळजनक दावा दानवे यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर बोलताना दानवे म्हणाले की, या सरकारमध्ये सहभागी भिन्न विचाराच्या पक्षातील नेत्यामध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे. कुणासा पायपुस कुणाला नाही. त्यामुळे हे सरकार येत्या दोन महिन्यात कोसळणार. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार विराजमान होईल, असा दावा त्यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी ही निवडणुक अत्यंत महत्वाची आहे. राज्यातील जनतेला भाजप सारखा पक्ष हवा आहे. ते या निवडणुकीतून परत सिद्ध होईल, असेही ते म्हणाले आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त ते परभणीत बोलत होते. हे देखील वाचा- Mumbai: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

याआधी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दोन दिवसांपूर्वी सरकार बदलण्याबाबत भाष्य केले होते. दरम्यान ते म्हणाले होते की, राज्यातील जनता आज त्रस्त आहे. उद्या महाराष्ट्रातील पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला महाविकास आघाडी सरकार नको हे स्पष्ट होईल. तुमच्या एक वर्षाच्या सरकारला जनता त्रस्त झाली आहे. महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली होतील, असेही दरेकर म्हणाले होते.