Mumbai: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊलं उचलण्यात येत आहेत. 6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जनतेने चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. तसंच कोरोना संकटात परिस्थितीचे भान राखून कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने चैत्यभूमीवरील व्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी ई-आढावा घेतला आहे. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख सहभागी झाले होते.

तसंच महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिवादन करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Local Update: या आठवड्यातील कोरोनाची स्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भातील निर्णय घेऊ, आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली माहिती)

MAHARASHTRA DGIPR Tweet:

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने ठाकरे सरकारने अनेक नवे नियम लागू केले आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांचा RT-PCR Test रिपोर्ट निगेटीव्ह असणं अनिवार्य आहे. तसंच तो प्रवासादरम्यान सोबत बाळगणे देखील बंधनकारक आहे.

दरम्यान, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर पुढील 8-10 दिवसांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तर शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लागू करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन लावायचा नाही परंतु, नियमांचे पालन न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या संवादात म्हटले आहे.