Mumbai Local Update: या आठवड्यातील कोरोनाची स्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भातील निर्णय घेऊ, आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली माहिती
Iqbal Singh Chahal (Photo Credit: Wikimedia Commons/ Twitter)

कोरोना व्हायरसची (Coronavirus) कमी झालेली रुग्णांची संख्या पुन्हा एकदा हळूहळू वाढू लागली आहे. यामुळे मुंबईतील शाळा अद्याप सुरु करण्यात आलेल्या नाहीत. त्याचबरोबर मुंबई लोकल रेल्वे (Mumbai Local) सामान्यांसाठी कधी सुरु होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी या आठवड्यातील कोरोनाची स्थिती पाहून मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेऊ अशी माहिती ABP माझाशी बोलताना दिली. सद्य स्थितीत महिलांसाठी लोकल सेवा ठराविक वेळेसाठी सुरु करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवांमध्ये येणा-या कर्मचा-यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आलेली आहे.

दिवाळीनंतर कोरोनाच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार हळूहळू संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे एकूणच परिस्थिती लक्षात घेता अजून काही दिवस तरी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची वाट पाहावी लागेल. दरम्यान अनलॉकच्या टप्प्यात हॉटेल, मार्केट, प्रार्थनास्थळे सुरु झाली आहेत. त्याचबरोबर लोक दिवाळीसाठी बाहेरगावी तसेच गावी गेलेले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता या सर्वाचा कोरोनाच्या स्थितीवर काही फरक पडतो की नाही ते पाहावे लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.हेदेखील वाचा- School Reopen In Maharashtra: राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे वर्ग आजपासून सुरु; मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरात शाळा बंदच

या सर्वांचा कोरोना स्थितीवर होणार परिणाम पाहता मुंबई लोकल सुरु करण्याबाबतचा पुढील विचार केला जाईल अशी माहिती चहल यांनी दिली आहे.

मुंबईत काल दिवसभरात 1135 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,75,707 वर पोहोचली असून मृतांची संख्या 10,673 वर पोहोचली आहे. सद्य घडीला मुंबईत 9970 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दिवसभरात 618 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 52 हजार 127 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.