School Reopen In Maharashtra: राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे वर्ग आजपासून सुरु; मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरात शाळा बंदच
School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रदीर्घ काळानंतर आजपासून पुन्हा एकदा राज्याच्या ग्रामीण भागातील शाळांतील काही वर्ग पुन्हा एकदा सुरु (School Reopen In Maharashtra) होत आहेत. प्राप्त माहितीनुसार, इयत्ता नववी ते इयत्ता 12 पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येत आहेत. असे असले तरी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरात शाळा बंदच राहणार आहेत.

राज्य सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे ग्रामीण भागातील कोरोना व्हायरस संकट काही प्रमाणात थोपविण्यात यश आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा रुग्णवाढीचा आकडा बऱ्याच प्रमाणात कमी आला आहे. त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत सरकार पुढे जात आहे. त्यामुळे सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि अमरावती अशा जिल्ह्यांमध्ये शाळांचे वर्ग सुरु होत आहेत. दुसऱ्या बाजूला पुणे, कोल्हापूर आदी जिल्ह्यातही ग्रामिण भागात काही शाळांचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. (हेही वाचा, CBSE 10th and 12th Exam Date: 10 वी आणि 12 वी सीबीएसई परीक्षा होणार, लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाणार)

ज्या शाळांचे वर्ग सुरु करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. जसे की, सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे अशाच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. याशिवाय विद्यार्थांच्या शरीराचे तापमानही तपासले जात आहे.

एका बाजाला शाळा सुरु करण्यात येत असल्या तरी दुसऱ्या बाजूला मात्र शाळा अथवा वर्ग सुरु करण्यात येऊ नयेत, अशी मागणी होत आहे. प्रामुख्याने शिक्षक संघटना आणि काही पालक संघटनांकडून ही मागणी होत आहे. अनेक शिक्षकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यात येऊ नयेत, असे या संघटनांचे म्हणने आहे. दरम्यान, शाळांचे वर्ग तर सुरु करण्यात आले आहेत. पुढे काय होते याबाबत उत्सुकता आहे.