राज्य विधिमंडळाचे पवसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान विविध मुद्दे चर्चेला येत असतानाच एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही कथीत क्लीप (Prashant Bamb Viral Audio Clip) भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आणि जिल्हा परिषद शाळा शिक्षक (Zilla Parishad Teacher) यांच्यातील संवादाची आहे. या क्लिपची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. या संवादामध्ये जिल्हा परिषद शिक्षक प्रशांत बंब यांना धारेवर धरत चांगलेच वाभाडे काढताना दिसत आहे. प्रशांत बंब यांनी सुरुवातीला या शिक्षकाला आपणास लाज वाटते का? असे विचारले असता तुम्हाला लाज वाटते का? तुमच्या मतदारसंघात असंख्य समस्य आहेत. मुलांना शाळेत स्वच्छतागृह नाही. तुम्ही आम्हाला का सांगता. आम्ही चांगले काम करतो. लोकप्रतिनिधी आम्हाला काम करु देत नाही, असे म्हणत तुम्हालाच लाज वाटते का? असा थेट सवाल या शिक्षकाने प्रशांत बंब यांना विचारला आहे. या ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा प्रसारमाध्यमांतून आणि सोशल मीडियातून होते आहे.
आमदार प्रशांत बंब आणि क्लिपमधील शिक्षक यांच्यातील हे संभाषण कधीचे आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच, या कथीत शिक्षकाचीही ओळख पटू शकली नाही. मात्र, सोशल मीडियावर ऑडीओ क्लिप जोरदार व्हायरल झाली आहे. हा शिक्षक शिक्षण व्यवस्थेतील दुरावस्थेवरुन आमदार बंब यांना प्रश्न विचारताना दिसतो आहे. आमदार प्रशांत बंब त्यांना उडवाउडवीची उत्तरे देताना आढळतात. परंतू, हा शिक्षक आपल्या मुद्द्यांवर ठाम राहून प्रश्न विचारतो. त्यामुळे आमदार बंब काहीसे चिडचिडे होतात. ते सरळ त्या शिक्षकाची लाज काढतात. त्यावर शिक्षकही संतापतो. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळते. (हेही वाचा, Maharashtra: 'शिवसेनेत अंतर्गत खदखद आहे' रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया)
प्रशांत बंब यांना हा शिक्षक कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषदेतील दुरावस्थेबाबत सांगत असातना दिसतो. तो विचारतो की, तुमच्या तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शौचालयं नाहीत, पत्रे उडाले आहेत. तुमचं या शाळांकडे लक्ष आहे का? तुम्ही सरकारी कायद्याबाबत इतकं बोलता, पण तुमच्या भागातील शाळांची तरी तुम्हाला काळजी आहे का? शिक्षकाच्या प्रश्नावर आमदार बंब चांगलेच संतापले, ते म्हणाले आम्ही सभागृहात नेहमीच आवाज उठवतो. पण, तुम्ही चांगले काम करत नाही. त्यामुळे लोक जिल्हा परिषद शाळेत मुले घालत नाहीत. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. यावर ? शिक्षकही संतापतो. तुम्हाला लाज वाटते का? तुमची मुले कोणत्या शाळेत शिकली. माझी मुलगी जिल्हा परिषद शाळेतच शिकली आहे. तुम्ही काय सांगता. तुम्हालाच लाज वाटायला पाहिजे. शिक्षक चांगले काम करतात. लोकप्रतिनिधी त्यांना काम करु देत नाही, असेही या शिक्षकाने सुनावल्याचे पाहायला मिळते.