राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे वारंवार अवाहन केले जात आहे. अशातच महापालिकेकडून सुद्धा कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 31 मार्चला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भुमिपूजनाचा सोहळा पार पडला. त्यावेळी राज्य सरकारमधील विविध नेते मंडळींची उपस्थिती तेथे दिसून आली. या वरुनच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थितीत केला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, मुंबई महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे.(शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक भूमिपूजन कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण नसल्यावरून नितेश राणे यांनी केलं खोचक ट्वीट)
Tweet:
मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा... pic.twitter.com/VfmfKhllmw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 2, 2021
दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्क जवळ असलेल्या पूर्वीच्या महापौर बंगल्याच्या जागी आता बाळासाहेबांचं स्मारक उभारले जाणार आहे. एकीकडे उधाणणारा फेसाळता अरबी समुद्र आणि दुसरीकडे बाळासाहेबांनी भाषणं गाजवलेलं शिवतीर्थ यांच्या मधोमध असलेली स्मारकाची जागा खास असल्याचे म्हटले जात आहे. तर पावसाळ्यापूर्वी काही काम पूर्ण करता यावं या दृष्टीने 31 मार्चला भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.