नितेश राणे (Photo Credits: Facebook)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक भूमिपूजनाचा कार्यक्रम आज मुंबई मध्ये होणार आहे. दरम्यान कोविड 19 ची परिस्थिती पाहता या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेणार आहेत. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक भूमिपूजन कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्य नावाचा उल्लेख आमंत्रण पत्रिकेवर आहे. दरम्यान या कार्यक्रमावरून आणि निमंत्रण पत्रिकेवरून भाजपाच्या नितेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. त्याबाबत ट्वीट करताना राणेंनी दोन गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. सर्वात प्रथम त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्यावरून निशाणा साधताना,'बाळासाहेब असते तर आज त्यांनी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण दिले असतं असं म्हटलं आहे. तर या आमंत्रण पत्रिकेमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने प्रोटोकॉल वरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख Balasaheb Thackeray राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन 31 मार्चला; ऑनलाईन पद्धतीने पार पडणार कार्यक्रम.

नितेश राणे ट्वीट

दरम्यान काल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक भूमिपूजन कार्यक्रमाचं ऑनलाईन आयोजन करण्यात आलं असून आज (31 मार्च) दिवशी त्याचं भूमिपूजन होणार असल्याचं म्हटलं आहे. शिवाजी पार्क जवळ असलेल्या पूर्वीच्या महापौर बंगल्याच्या जागी आता बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एकीकडे उधाणणारा फेसाळता अरबी समुद्र आणि दुसरीकडे बाळासाहेबांनी भाषणं गाजवलेलं शिवतीर्थ यांच्या मधोमध असलेली स्मारकाची जागा खास असल्याचं म्हटलं आहे. पावसाळ्यापूर्वी काही काम पूर्ण करता यावं या दृष्टीने आज भूमिपूजन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.