BJP Corporator Vijay Tad Shot Dead: भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या, सांगली जिल्ह्यातील जत येथील घटना
Vijay Tad | (Archived, Edited Images)

Vijay Tad Shot Dead: जत नगरपालिकेचे भाजप नगरसेवक विजय ताड (Vijay Tad) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जत (Jath Taluka) येथील सांगोला रस्त्यावरील अल्फोंसो स्कूलजवळ अज्ञातांनी ताड यांची इनोव्हा गाडी अडवली आणि त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात ताड यांचा मृत्यू झाला आहे. मारेकऱ्यांनी ताड यांचा मृतदेह दगडाने ठेचला. या घटनेमुळे संपूर्ण जत तालूका आणि सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. एखाद्या राजकीय नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केल्यामुळे सांगली जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

सांगोला रोडवर असलेल्या शाळेतून आपल्या मुलांना आणण्यासाठी विजय ताड हे इनोव्हा गाडीने निघाले होते. यावेळी ते अल्पा्सो स्कूलजवळ पोहोचले असता त्यांचा पाटलाग करत असलेल्या अज्ञातांनी त्यांची गाडी अडवली. काही कळायच्या आतच त्यांनी विजय ताड यांच्यावर गोळीबार सुरु केला. खाली कोसळलेल्या ताड यांच्या डोक्यात मारेकऱ्यांनी दगड घातला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तापसही सुरु केला आहे. दरम्यान, ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असावी अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विजय ताड हे भाजपचे आक्रमक नगरसेवक म्हणून ओळखले जात. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सहकार्याने भाजपची सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री असलेले भाजप नेते दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि राज्याच्या गृहमंत्रालयाचा कारभारही देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. अशा स्थितीत भाजप नगरसेवकाची हत्या होते आणि आरोपी फरार होतात हे धक्कादायक मानले जात आहे.