सध्या महाराष्ट्रामधील कोरोना विषाणूचे संकट वाढत असताना दिसत आहे. अनेकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात बर्ड फ्लूने (Bird Flu) थैमान घातले होते. मात्र आता दिलासादायक बाब म्हणजे राज्यामध्ये बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. ही माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली. महाराष्ट्रात 16 फेब्रुवारी 2021 रोजी एकूण 70 पक्षांमध्ये मरतुक झाली आहे. कुक्कुट आणि बदक पक्षांमधील नमुने होकारार्थी आल्यानुसार, क्षेत्रास ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून 1 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येते. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 7,12,172 कुक्कुट पक्षी, 26,03,728 अंडी व 72,974 किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे. यासह नष्ट केलेल्या अंडी, खाद्य व पक्ष्यांच्या नुकसान भरपाईसाठी 3 कोटी 38 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. (हेही वाचा: धक्कादायक! महाराष्ट्रात पुन्हा वाढतोय कोरोना व्हायरस? 24 तासात 4,787 जण संक्रमित, 40 जणांचा मृत्यू)
सर्व कुक्कुट पक्षीधारकांनी जैव सुरक्षा उपाययोजनांचे तंतोतंत पालन करावे, शास्त्रीय आधार नसलेले गैरसमज, अफवा पसरवू नयेत असे आवाहन पशुसंवर्धनमंत्रांनी केले आहे. अफवा व गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे. कुक्कुट पक्षांचे मांस व अंडी हा प्रथिनांचा स्वस्त असणारा स्त्रोत आहे. पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.