शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये विभागले गेले आहेत. ही फूट केवळ पक्षापुरती मर्यादीत न राहता घरामध्येही झाली आहे. बाळासाहेबांचे खंदे शिवसैनिक असलेल्या गजानन कीर्तीकर यांच्यानंतर आता सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या घरामध्येही फूट पडली आहे. बाळासाहेब ठाकरे ते आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत 3 पिढी ठाकरे कुटुंबांच्या जवळ असलेल्या सुभाष देसाई यांच्या मुलाने शिंदे गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना (Shiv Sena) पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. नक्की वाचा: खासदार गजानन कीर्तिकर बाळासाहेबांची शिवसेना गटात दाखल होताच उद्धव ठाकरेंकडून त्यांची नेतेपदावरुन हकालपट्टी; अमोल कीर्तीकर उपनेते पदावर कायम .
भूषण देसाई हे सुभाष देसाई यांचे सुपूत्र आहेत. मुंबई मध्ये आज त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी बोलताना त्यांनी ' बाळासाहेब हेच माझे दैवत असल्याचं म्हटलं आहे. बाळासाहेब आणि शिवसेना दोन्ही सोडून अन्य काहीच समोर आलेले नाही. एकनाथ शिंदे हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.' असं त्यांनी म्हटलं आहे. आपण कोणत्याही घोटाळ्याच्या चौकशीच्या ससेमिरा मागे लागल्याने हा पक्षप्रवेश केला नसल्याचंही यावेळी स्पष्ट केले. तर आपण वडील सुभाष देसाई यांच्याशी यापूर्वीच आपल्या या निर्णयाविषयी बोललो आहे. त्यांना सांगून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचं म्हटलं आहे. पण त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलणं भूषण देसाईंनी टाळलं आहे.
सुभाष देसाई हे 'मातोश्री' च्या अत्यंत जवळच्यांपैकी एक आहेत. 'मार्मिक' च्या कामापासून महाविकास आघाडी सरकार मध्ये उद्योगमंत्री पदापर्यंतच्या अनेक जबाबदार्या सुभाष देसाई यांनी सांभाळल्या आहेत. कालच झालेल्या गोरेगाव मधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुभाष देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह गेलेल्या आमदार, खासदारांवर टीका करत घणाघात केले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनीही सुभाष देसाई अनेकदा आपल्याकडे उद्धव ठाकरे यांना नुसती मानसिक साथ देण्यासाठी या वयातही येऊन बसतात, चर्चा करतात असं म्हणतं त्यांच्या 80शी पार वयातील काम करण्याच्या जिद्दीचं कौतुक केले होते.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी भूषण देसाई यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर बोलताना ज्यांना ज्या वॉशिंग मशीन मध्ये जायचं आहे त्यांनी जावं असं म्हणताना भूषण देसाईंचा यापूर्वी कधीही त्यांच्या संबंध नसल्याचंही म्हटलं आहे. मात्र सुभाष देसाई यांच्यामधील उत्साह आजही नौजवानांसारखाच आहे तो घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत राहू असं म्हटलं आहे.