शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटामधून काल (11नोव्हेंबर) खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेल्या जुन्या जाणत्यांपैकी एक गजानन कीर्तीकर होते. मागील काही दिवसांपासून गजानन कीर्तीकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती पण त्यांच्या मुलाकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. पण त्याला यश आले नाही आणि काल अखेर रविंद्र नाट्य मंदिरामध्ये एका कार्यक्रमामध्ये गजानन कीर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. यानंतर तातडीने उद्धव ठाकरेंकडून थेट त्यांना नेतेपदावरून हटवण्यात आले आहे. पण कीर्तीकरांचा मुलगा अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे.
अमोल कीर्तीकर यांच्यावर काही महिन्यांपूर्वी उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. गजानन कीर्तीकर गेले तरीही अमोल उद्धव ठाकरेंसोबत कायम असल्याने त्यांच्यावरील जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. हे देखील वाचा: Maharashtra Politics: उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, खासदार गजानन कीर्तिकर यांचा शिंदे गटात प्रवेश.
शिवसेना नेतेपदावरून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी ! pic.twitter.com/tH9tANHqxH
— Shivsena Communication (@ShivsenaComms) November 12, 2022
गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या 13 वर गेली आहे. गजानन कीर्तिकर हे मुंबईच्या मालाड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये त्यांच्यावर गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. ते सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
काल एकीकडे आदित्य ठाकरे कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांच्यासोबत 'भारत जोडो' यात्रेमध्ये सहभागी होत आपला पाठिंबा देत असताना गजानन कीर्तीकर यांच्यासारखा शिवसेनेचा जुणा-जाणता नेता उद्धव ठाकरेंपासून दूर गेला आहे.
गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांच्याकडून हे पत्रक जारी करण्यात आले आहे.