कोरेगाव भीमा विजयस्तंभ (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरेगाव भीमा (Bhima-Koregaon) येथे हुतात्मा झालेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. शौर्यदिनानिमित्त आज याठिकाणी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पार पडत आहे. दरवर्षी आंबेडकरांचे लाखो अनुयायी या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. आजही विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटना आणि मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून भीमसागर लोटणार आहे. राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांनी सकाळीच कोरगाव भीमा येथे उपस्थित राहून, विजयस्थंभाला अभिवादन केले. नवनिर्वाचित मंत्री नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेदेखील विजयस्तंभाला अभिवादन देण्यासाठी येण्याची शक्यता आहे.

दरवर्षी आजच्या दिवशी इथे होणारी गर्दी पाहता, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हा सोहळा शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने पूर्ण काळजी घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, पुणे पोलिसांकडून 250 व्हॉट्सअॅप ग्रुप्सना (Whatsapp Groups) नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. या दिवशी कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणारी पोस्ट व्हायरल करु नये म्हणून खबरदारी घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 163 लोकांना भीमा कोरेगाव गाव बंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची नावे आहेत. (हेही वाचा: भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांकडून 250 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सला नोटीस)

दरम्यान, इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालीयनने मोठी कामगिरी बजावली होती. 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रजांनी महार बटालीयनच्या मदतीने पेशव्यांचा पराभव केला होता. धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. यंदा या लढाईला 202 वर्षे पूर्ण होणार आहेत. 1927 साली बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे पहिल्यांदा एक छोटेखानी कार्यक्रम घेत अभिवादन केले होते. त्यानंतर ही दरवर्षीच्या अभिवादानाची प्रक्रिया सुरु झाली. दोन वर्षांपूर्वी इथे उफाळलेला हिंसाचार पाहता यंदा सरकारकडून सुराक्षा व्यवस्था अगदी चोख बजावण्यात आली आहे.