Baba Siddique Murder Case: मुंबई क्राईम ब्रँचने बाबा सिद्दीकी हत्या(Baba Siddique Murder) प्रकरणात गौरव विलास अपुणे (Gaurav Apune) याला दोन दिवसांपूर्वी पुण्यातून अटक केली होती. चौकशीदरम्यान गौरवने सिद्दीकी यांच्या हत्येसाठी बनवलेला प्लान ए फसला तर बॅकअपसाठी प्लान बी आखल्याचे सांगितले. 'प्लॅन ए' अयशस्वी झाल्यास 'प्लॅन बी' साठी एकूण सहा शूटरची भरती करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत गुन्हे शाखेने पाच पिस्तुले आणि 64 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. (Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये अजून एक आरोपी पुण्यामधून अटकेत)
बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी प्लॅन बी
मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासात आता बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी बॅकअप प्लॅनही तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. प्लॅन बी अंतर्गत शूटर म्हणून असलेला गौरव विलास हा गोळीबाराच्या सरावासाठी झारखंडला गेला होता. त्याच्यासोबत या प्रकरणात यापूर्वी अटक केलेला आरोपी रूपेश मोहोळ हाही झारखंडला गेला होता. तेथे दोघांनी फायरिंगचा सरावही केला. या दोघांना मास्टरमाइंड शुभम लोणकर याने सरावासाठी पाठवले होते.
झारखंडमध्ये नेमबाजीचा सराव
सरावासाठी त्यांना शस्त्रेही पुरवली होती. गुन्हे शाखेचे अधिकारी त्या ठिकाणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गौरवला झारखंडमध्ये शूटिंगचा सराव देण्यात आला होता. गौरव खुनात प्लान बी म्हणून सक्रिय होता. जर प्लॅन ए अयशस्वी झाला, तर ती बॅकअप योजना होती. गौरव अपुणे आणि रूपेश मोहोळ 28 जुलै रोजी झारखंडला गेले होते, जिथे त्यांनी एक दिवस गोळीबाराचा सराव केला होता. 29 जुलै रोजी पुण्यात परतले आणि शुभम लोणकरच्या संपर्कात राहिले.
घरच्यांना सहलीचे कारण सांगितले
झारखंडला जाण्यापूर्वी अपुने याने कुटुंबियांना सांगितले की, तो उज्जैन येथे मित्रांसोबत सहलीला जात आहेत. हत्या झाल्यास रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम कोहर आणि गौरव अपुणे यांना शुभम लोणकरने चार मोठ्या बक्षिसांचे आश्वासन दिले होते. हत्येसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये, एक अपार्टमेंट, कार आणि दुबईची सहल देण्याचे मान्य झाले होते.
'प्लॅन ए' अयशस्वी झाल्यास 'प्लॅन बी'साठी एकूण सहा शूटरची भरती करण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी आतापर्यंत गुन्हे शाखेने पाच पिस्तुले आणि 64 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. यामध्ये मुंबईतून तीन, पनवेलमधून एक आणि पुण्यातून एक पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. अजून एक पिस्तूल आणि सुमारे 40 ते 50 जिवंत काडतुसे असण्याची शक्यता गुन्हे शाखेला असून ते शोधण्याचे काम सुरू आहे.