Baba Siddique 1 (फोटो सौजन्य - एक्स)

मुंबई क्राईम ब्रांच कडून आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये (Baba Siddique Murder Case) 16 व्या आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचं नाव Gaurav Appune आहे. आरोपी गौरव 23 वर्षांचा आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये गौरव अन्य आरोपींना अनेकवेळा भेटल्याची आणि त्यांच्यासोबत हत्येचा कट रचल्यात सहभागी झाल्याची माहिती आहे.

गौरव हा हत्येमध्ये पहिल्या फळीतील मारेकर्‍यांच्या संपर्कामध्ये होता. पहिल्यांदा ज्यांना बाबा सिद्दीकींची हत्या करण्याची सुपारी दिली होती त्यांनी बॅक आऊट केले. आता पोलिस गौरवला कोर्टात दाखल करून त्याची कोठडी मागणार आहेत.

बाबा सिद्दीकी हे एनसीपीचे नेते होते. त्यांच्यावर लेक झीशान सिद्दीकीच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयाबाहेर रात्री 9 च्या सुमारास गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. ही घटना 12 ऑक्टोबरला दसरा सणाच्या रात्रीची आहे. हत्येनंतर काही वेळातच लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या नावे एक पोस्ट लिहित हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांची जवळीक सलमान खानशी असल्याने हा हल्ला केल्याचा दावा करण्यात आलेला आहे.

नुकतीच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी निगडीत प्रत्यक्षदर्शीला देखील 5 कोटीची खंडणी द्या अन्यथा जीव गमवा अशी धमकी देण्यात आली आहे. फोन वर दिलेली ही धमकी देखील लॉरेन्स बिष्णोई च्या नावे असल्याची माहिती आहे. याबाबत खार पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मुंबई क्राईम ब्रांच कडून सध्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे? याचा तपास सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशानने पोलिसांना सार्‍‍या बाजूने तपास करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये वापरलेली हत्यारं राजस्थान मधून आणल्याचा दावा आहे. यामधील 5 हत्यारं ताब्यात घेण्यात आली असून सहाव्या हत्याराचा शोध सुरू आहे.