पुणेकरांसाठी (Pune) एक आनंदाची आहे. पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airport) उद्घाटनाची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही घोषणा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ मार्च 2029 पर्यंत कार्यान्वित होईल. मोहोळ यांनी सांगितले की, पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असून, विमानतळाचा डीपीआर सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करुन, मार्च 2029 पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
विमानसेवा आणि विमानतळांच्या विकासाबाबत आढावा बैठक-
महाराष्ट्रातील विमानसेवा आणि विमानतळांच्या विकासाबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील 'सह्याद्री' येथे पार पडली. राज्यातील विमानतळांच्या विकासकामांना गती देणे आणि विमानसेवा वाढविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), लष्कर, महाराष्ट्र विमानतळ महामंडळ आणि इतर विविध सरकारी संस्थांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व भागधारकांनी चर्चेत भाग घेतला.
इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम नियोजित वेळेत अर्थात मार्च 2025 पर्यंत पूर्ण करणे. मार्च 2025 ला देशांतर्गत आणि एप्रिलला 2025 आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याते नियोजन.
नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे रि-कार्पेटिंगचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत म्हणजेच, 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करणे.
अमरावती विमानतळ येथे नाईट लॅडिंगची सुविधा वेगाने पूर्ण करुन, दक्षिण आशियातील सर्वात मोठा एफटीओ जुलै 2025 पर्यंत पूर्ण करणे.
सोलापूर विमानसेवा लवकर सुरु करणे आणि कोल्हापूर विमानतळ येथे धावपट्टी विस्तारिकरण करण्यासाठी लवकरात लवकर भू-संपादन करणे. तसेच दोन्ही विमानतळांवर नाईट लँडिंग सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करणे. (हेही वाचा: Cable Car Project: वाहतूक ताण कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशमध्ये सुरु होऊ शकतो केबल कार प्रकल्प; परिवहन मंत्री Pratap Sarnaik करणार नितीन गडकरींशी चर्चा)
जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करण्याचा निर्णय.
गडचिरोलीचे येथे विमानतळ साकारण्यासाठी भूसंपादन सुरु करणे.
रत्नागिरी, गोंदिया, अकोला आणि संभाजीनगर विमानतळांच्या सुविधा आणि विमानसेवा संदर्भात सकारात्मक चर्चा.
पवना, गंगापूर, खिंडसी आदी धरणात Water Aerodrome साठीचे सर्वेक्षण तातडीने करावे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टी वाढवण्यासाठीचा OLS पूर्ण झाले असून, भूसंपादन येत्या 6 महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन.
आंतरराष्ट्रीय बंदर असलेल्या वाढवण येथील प्रस्तावित विमानतळाबाबत लवकरत निर्णय घेण्यात येईल.
AAI, MADC, MIDC, CIDCO संचलित व इतर विमानतळांच्या संदर्भात भूसंपादन, टर्मिनल बांधकाम, पायाभूत सुविधा, नाईट ललॅंडिंग, धावपट्टी विस्तारीकरण, उडान योजनेचा विस्तार अशा विविध विषयांवर व्यापक चर्चा.