औरंगाबाद: साई रंगदाळ या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी बनवला रोबोट; औषधं, अन्न पोहचवण्यासाठी करणार मदत
Shourya Robot| Photo Credits: Twitter/ ANI

जगभरामध्ये कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यावर अद्याप ठोस औषध किंवा लस नसल्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच त्याला फैलाव कमी करण्याचा उपाय सुचवला जात आहे. अशामध्ये कोव्हिड 19 च्या वॉर्डमध्ये काम करणार्‍या नर्स आणि इतर कर्मचार्‍यांना सुरक्षित ठेवण्याच्या कल्पनेतून महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) शहरामध्ये साई रंगदाळ (Sai Suresh Rangdal) या 7वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने एक रोबोट डिझाईन केला आहे. कोरोनावर उपचार घेणार्‍या रूग्णांना औषधं, अन्न पोहचवताना फिजिकल कॉन्टॅक्ट टाळण्यासाठी हा रोबोट काम करणार आहे. या रोबोटचं नाव 'शौर्य' आहे.

साईने बनवलेला रोबोट हा बॅटरीवर काम करतो. स्मार्टफोनच्या आधारे ऑपरेट करता येऊ शकतो. तर 1 किलो वजनापर्यंत भार देखील उचलू शकतो. असा दावा साईने केला आहे. दरम्यान आरोग्य यंत्रणेवरील वाढता भार पाहता आता कमीत कमी फिजिकल कॉन्टक्ट मेडिकल स्टाफवर यावा आणि त्यांना सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. सध्या जगभरात जसे कोरोनावर उपचार शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जनजीवन कसे सुरळीत करता येऊ शकतं यासाठी पर्याय शोधण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. सोलापूर रेल्वे हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू झालाय रोबोट! वाचा सविस्तर.

 

ANI Tweet   

औरंगाबाद हे महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉट्सपैकी एक आहे. येथे दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊनचेही पालन करण्यासाठी येथे पोलिसांच्या सोबतीला स्वयंसेवी युवक मंडळ आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.  औरंगाबाद मध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1453 झाली आहे. यापैकी 901 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 484 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 60 हजारांच्या उंबरठ्यावर आहे.