सोलापूर रेल्वे हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू झालाय रोबोट! वाचा सविस्तर
Imgae For Representation (Photo Credits- Pixabay)

सोलापूर रेल्वे हॉस्पिटल (Solapur Railway Hospital)  मध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) सेवेसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सोबतच एक रोबोट (Robot) सुद्धा रुजू झाल्याचे समजत आहे. काल मंगळवारी या रोबोटने हॉस्पिटल मधील कामाची जबाबदारी घेतली. कोरोना रुग्णांना वेळच्यावेळी औषध देण्याचे काम सध्या हा रोबोट करत असल्याचे समजतेय. हा रोबोट डॉक्टर्स आणि कोरोना रुग्णांमधील संवादाचा दुवा ठरला आहे ज्यामुळे थेट संपर्कात न येता डॉक्टरांना आपल्या रुग्णांची काळजी घेता येत आहे. खबरदारी म्हणून या रोबोटला सुद्धा काही तासांच्या अंतराने सॅनिटायजर लावून निर्जंतुक करण्यात येते. Coronavirus Update Of Maharashtra: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सहित तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

मागील अनेक प्रकरणात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते, अशावेळी डॉक्टर्स, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कठीण होत चालला होता, मात्र त्यावर या हटके पद्धतीने उपाय शोधण्याचे काम सोलापूर रेल्वे हॉस्पिटलच्या तांत्रिक विभागाने केले आहे. टाइम्सच्या माहितीनुसार, सोलापूर विभागीय रेल्वे मॅनेजर शैलेश गुप्ता यांची ही कल्पना होती.

सोलापुर रेल्वे वर्कशॉप मध्ये हा रोबोट तयार करण्यात आला आहे. अगदी याचे पार्ट्स बनवण्यापासून ते एकूण सिस्टीम तयार करण्यापर्यंत सर्वकाही अवघ्या 50 हजार रुपयात झाल्याचे समजतेय. हा एक रोबोट एकदा चार्जिंग केल्यावर सलग 36 तास काम करू शकतो. तसेच दुरवरूनही याला मोबाईलच्या साहाय्याने चालवता येते, त्यामुळे रुग्णांच्या थेट संपर्कात येण्याचा मुद्दाच उद्भवत नाही. या रोबोटचे कंट्रोलिंग करण्यासाठी या प्रकल्पाशी संलग्न एका गटाने मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले आहे.

दरम्यान, अवघ्या काहीच तासात या रोबोटची प्रचंड चर्चा झाल्याने आता सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सुद्धा असाच रोबोट तयार करण्याचा विचार सुरु आहे. यासाठी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे हॉस्पिटल मध्ये येऊन या रोबोटची पाहणी सुद्धा केली आहे.