प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : PTI)

म्हाडाच्या (MHADA) घरांच्या विक्रीसाठी प्रत्येकवेळीच लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आता घरांनंतर म्हाडाच्या गाळ्यांचा (MHADA Stores) लिलाव होणार आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्यांदाच हा लिलाव ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑनलाईन लॉटरीसाठी म्हाडाकडून स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरमुळे या लिलावासंदर्भातील अनेक गोष्टी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे लोकांच्या वेळेची बचत होईल. तब्बल 10 वर्षानंतर म्हाडा अशाप्रकारे ऑनलाईन लिलाव करणार आहे.

28 मे ते 31 मे या तीन दिवसांमध्ये म्हाडाच्या गाळ्यांचा लिलाव होणार आहे. यामध्ये मुंबई आणि कोकण विभागातील 274 गाळ्यांची विक्री होईल. यासाठी www.mhada.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. या वेबसाईटवर संपूर्ण प्रक्रियेची माहिती, गाळ्यांची माहिती, बोली कशी लावली जाईल याबाबत प्रात्यक्षिक अशा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत.

नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ओटीपी (OTP) जनरेट करावा लागणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे  ई-मेल, पॅन क्रमांक, मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे.

अशी लावा बोली – या बोलीत कोण सहभागी होईल याबाबत गुप्तता बाळगली जाणार आहे. बोली लावताना गाळ्यांच्या असलेल्या मूळ रकमेपेक्षा, दहा हजार जास्त रुपयांची बोली लावणे बंधनकारक आहे. बोलीची नोंद झाल्यावर स्पर्धकांना 10 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. या बोलीची निकाल 1 जून रोजी जाहीर केला जाईल.