गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर 'स्तुत्य उपक्रम' का राबत नाही? आशिष शेलार यांचा सवाल
Ashish Shelar (Photo Credits: ANI)

गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) हा "स्तुत्य उपक्रम" का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असे प्रश्न भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विचारले आहेत. शेलार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना यासंदर्भात एक पत्रदेखील लिहिलं आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्यांमुळे भाजप पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ठरवून कोंडी केली आहे. वेळीच ई-पास उपलब्ध करून दिले नाहीत. एसटी उपलब्ध करून दिली नाही. रेल्वे गाड्या सोडण्यास तयार असताना गाड्यांची मागणी वेळीत केली नाही. क्वारंटाईन कालावधी व आरोग्याच्या उपाययोजना याबाबत सरपंच आणि कोकणातील लोकप्रतिनिधी यांच्या वेळीच चर्चा केली नाही. सरकारच्या अशा आठमुठ्या भूमिकेतून मार्ग काढून कोकणी माणूस आपल्या गावी गणेशोत्सवासाठी पोहोचला. मात्र, चाकरमान्यांचे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी जीव मेटाकुटीस आणला. (हेही वाचा - UGC Final Year Examinations: 30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील, तर परीक्षा कशा घ्यायच्या? उदय सामंत यांचा सवाल)

मुंबई-गोवा महामार्ग पनवेल पासून चिपळूनपर्यंत पूर्णपणे उखडून गेला आहे. नव्यानं बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरील नव्या पुलांसह सर्व रस्त्यांवर डांबर शिल्लक राहिलेलं नाही. मार्गावर सर्वत्र खड्डे, खडी अवस्था आहे. खेड्यातील कच्च्या रस्त्यांपेक्षाही या महामार्गाची दयनिय अवस्था झाली आहे.

दरवर्षी पावसामुळे पडणारे खड्डे गणेशोत्सव काळात बुजवण्यात येतात. मात्र, यंदा राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमान्याना कंबरेचे आजार होतील की काय? अशी भीती वाटत आहे. कोकणच्या रस्त्याकडे सरकारने दुर्लक्षाबद्दल तसेच कोकणातील माणसाला मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल निषेध करतो. किमान आता तरी सरकारने खड्डे बुजवावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.