Hanuman Chalisa Row: नवनीत राणा यांच्या विरोधात आणखी एक FIR दाखल, पती Ravi Rana सह न्यायालयात पोहोचल्या खासदार
Navneet Rana, Ravi Rana (PC - ANI)

Hanuman Chalisa Row: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात महाराष्ट्रात आणखी एक एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

खार पोलीस ठाण्यात आतापर्यंत 3 गुन्हे दाखल झाले आहेत. यातील 2 गुन्हे नवनीत राणा यांच्यावर, तर तिसरा गुन्हा जमावाविरोधात दाखल करण्यात आला आहे. धार्मिक उन्माद पसरवल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. वांद्रे न्यायालयात पोलिस राणा दाम्पत्याच्या कस्टडीची मागणी करू शकतात. राज्य सरकारला आव्हान देण्यासाठी राणा दाम्पत्याला कोण मदत करत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांना जाणून घ्यायची आहेत. (हेही वाचा - मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना आव्हान देणाऱ्या Navneet Rana कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर)

नवनीत राणा यांच्या खारच्या घराबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी आतापर्यंत एकाही शिवसैनिकाला अटक करण्यात आलेली नाही. 600 ते 700 लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला. भादंवि कलम 143, 145,147,149, 37(1) आणि 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याने त्यांच्या घरावरील हल्ल्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासह 600 ते 700 अज्ञात शिवसैनिकांना जबाबदार धरत लेखी तक्रार दिली.

दरम्यान, आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना वांद्रे येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना वांद्रे येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात नेले आहे. आज रिमांडच्या कारवाईदरम्यान वकिल रिजवान मर्चंट राणा दाम्पत्याची बाजू मांडणार आहेत.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा राहत असलेल्या खारमधील इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना समर्थकांविरोधात मुंबई पोलिसांनी शनिवारी एफआयआर नोंदवला. तत्पूर्वी, राणा दाम्पत्याने शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर त्यांनी ही योजना रद्द केली.