माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Bail Stay) यांना सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात मुंबई हायकोर्टाकडून जामीन तर मिळाला. त्यामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर ते तुरुंगाबाहेर येण्याचा मार्गही मोकळा झाला. असे असले तरी त्यांच्या मार्गातील अडचणी अद्यापही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. अनिल देशमुख यांना जामीन मिळताच सीबीआयने (CBI) आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागायची आहे. त्यामुळे या जामीनास स्थगिती द्यावी, असा अर्ज न्यायालयाकडे केला. न्यायालयाने सीबीआयची मागणी मान्य करत देशमुख यांच्या जामीनास 10 दिवसांची स्थगिती (Stay on Bail Order) दिली आहे.
जामीनास स्थगिती मिळाल्याने अनिल देशमुख यांचा मुक्काम पुढचे 10 दिवस तरी तुरुंगात असणार आहे. अनिल देशमुखयांचे वकील अनिकेत निकम यांनी माहिती देताना सांगितले की, न्यायालयाने अनिल देशमुख यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळताच देशमुख यांनी आपला पासपोर्ट प्रशासानकडे जमा करावा. तसेच, आठवड्यातून 2 वेळा ईडी कार्यालयात येऊन हजेरी द्यावी. तसेच, तपासातही सहकार्य करावे, असे निर्देश न्यायालयाने अनिल देशमुख यांना दिल्याचे वकीलांनी सांगितले. (हेही वाचा, Anil Deshmukh Grants Bail: अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा, कोर्टाकडून जामीन मंजूर; राष्ट्रवादी काँग्रेससह कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष)
तत्कालीन मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासाघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. याच वेळी मुबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांनी राज्याच्या महासंचालकांना एक पत्र लिहीले होते. या पत्रात 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अनिल देशमुख हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले होते. दरम्यान, 1 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेल्यानंतर तिथेच इडीने त्यांना अटक केली. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत.