Anil Deshmukh | (Photo Credit : ANI/Twitter)

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh Grants Bail) यांना सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात अखेर जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुलक्यावर हा जामीन मंजूर झाला. मुंबई सत्र न्यायालयाच्या सीबीआय कोर्टाने जामीन नाकारल्यानतर अनिल देशमुख यांनी मुंबई हाय कोर्टात (Bombay High Court) दाद मागितली होती. त्यानुसार देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. राखून ठेवलेला निकाल कोर्टाने आज (सोमवार, 12 डिसेंबर) जाहीर केला. कोर्टाच्या निर्णयानुसार अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख यांच्या जामीनंतर नागपूर येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करण्यास सुरुवात केली.

तत्कालीन मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासाघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. याच वेळी मुबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांनी राज्याच्या महासंचालकांना एक पत्र लिहीले होते. या पत्रात 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अनिल देशमुख हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले होते. दरम्यान, 1 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेल्यानंतर तिथेच इडीने त्यांना अटक केली. (हेही वाचा, Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या पुत्रास मोठा दिलासा, मनी लॉड्रींग प्रकरणात ऋषिकेश देशमुखला जामीन मंजूर)

दरम्यान, प्रदीर्घ काळ इडी कोठडीत राहिल्यानंतर अनिल देशमुख यांना जामीन मिळाला. परंतू, दरम्यानच्या काळात सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे ईडी कोर्टात जामीन मिळाला तरी सीबीआय कोर्टाकडून जामीन मिळाला नसल्याने देशमुख यांना तुरुंगतच राहावे लागत होते. दरम्यान, एकाच प्रकरणात दोन गुन्हे आणि तेही केंद्रीय तपास यंत्रणांकडून दाखल झाल्याने प्रकरण गुंतागुंतीचे बनले होते. अखेर या दोन्ही तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमधून अनिल देशमुख यांना सशर्थ जामीन मिळाला आहे.

ट्विट

अनिल देशमुख यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना आपला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा लागणार आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांना विदेशात जाता येणार नाही. शिवाय त्यांना ईडी कार्यालयात आठवड्यातून दोन वेळा हजेरी लावावी लागणार आहे. तसेच, ईडी आणि सीबीआय जेव्हा बोलवतील तेव्हा हजर राहुन चौकशीला सहकार्य करावे लागणार आहे. अटी आणि शर्तींवीर देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.