Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे मुंबई पोलिसांचे ट्विटद्वारे आवाहन
Andheri Subway (Photo Credits: Twitter)

मुंबईत (Mumbai) कालपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आजही कायम आहे. त्यामुळे जागोजागी पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अंधेरी सबवे (Andheri Subway) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी याचे पालन करावे, अशी विनंतीही मुंबई पोलिसांनी केली आहे.

काल सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सांताक्रुझ येथील वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि मुंबई उपगनरात बुधवारी सकाळी 8.30 पासून गुरुवारी 8.30 पर्यंत 191.2mm पावसाची नोंद झाली आहे. तसंच आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

Mumbai Police Tweet:

कालही मुसळधार पावसामुळे किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी येथील रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवली होती. मात्र पाणी ओसरताच रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले होते. आजही पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा एकदा अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान काल झालेल्या पाऊस हा 2015 नंतर 24 तासांत पडणारा दुसर्‍या सर्वाधिक पाऊस म्हणून नोंदवण्यात आला. यापूर्वी गेल्या वर्षी 3 जुलै रोजी मुंबईत 24 तासांत पडलेला दशकातील सर्वाधिक पाऊस होता.