मुंबईत (Mumbai) कालपासून (15 जुलै) सुरु झालेला मुसळधार पाऊस आज (16 जुलै) सकाळपर्यंत सतत सुरु होता. मुंबईत मागील 24 तासांत तब्बल 1024mm इतका पाऊस पडला. त्यामुळे 2015 नंतर 24 तासांत पडलेल्या दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सरासरी पडणाऱ्या पावसापेक्षा हा पाऊस 122% नी अधिक आहे. सांताक्रुझ येथील वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि मुंबई उपगनरात बुधवारी सकाळी 8.30 पासून गुरुवारी 8.30 पर्यंत 191.2mm पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी 3 जुलै रोजी मुंबईत 24 तासांत पडलेला दशकातील सर्वाधिक पाऊस होता. त्या दिवशी तब्बल 375.2 mm इतक्या या पावसाची नोंद झाली होती. त्या मागोमाग 3 जुलै 2014 रोजी 207.2 mm आणि 24 जुलै 2013 रोजी 215.6 mm इतक्या पावसाची नोंद झाली होती. परंतु, मुंबईच्या इतिहासातील सर्वाधिक पाऊस हा 27 जुलै 2005 रोजी बरसला होता. याची नोंद तब्बल 944.2 mm इतकी होती.
कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईमध्ये बुधवारी सकाळी 8.30 ते गुरुवारी सकाळी 8.30 पर्यंत 116.6 mm इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यापैकी सर्वाधिक पाऊस हा गेल्या 12 तासांत पडला आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या सरासरी पावसापैकी 63% पाऊस म्हणजेच 1,418 mm इतका 1 जून ते 16 जुलै मध्ये पडला आहे.
मुंबई शहरातील विविध भागात गेल्या 24 तासांत झालेला पाऊस:
# बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स- 310 mm
# बांद्रा- 201 mm
# वरळी- 197 mm
# दादर आणि माझगांव- 140 mm पेक्षा अधिक
# महालक्ष्मी- 129 mm
गेल्या 24 तासांत दक्षिण आणि मध्य मुंबईत इतर उपनगरांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत इतर ठिकाणी झालेला पाऊस:
# रायगड- 130 mm
# रत्नागिरी- 100 mm
# ठाणे- 60 mm
IMD चे डिरेक्टर जनरल डॉ. मृत्यूंजय महोपात्रा यांनी असे म्हटले की, "हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, संपूर्ण मुंबईभर मुसळधार पाऊस पडला आहे आणि पुढील 24 तासांत मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये आज सकाळी 9 वाजल्यापासून पावसाचा जोर कमी झाला असला तरीही IMD च्या अधिकाऱ्यांनी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे."