त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचाराचे लोण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. राज्यातील जवळजवळ 6 जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उफाळला होता. काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील (Amravati) परिस्थिती चिघळली होती. या ठिकाणी जमावबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये पुढील आठवड्यापर्यंत काही प्रमाणात शिथिलता देऊन कर्फ्यू सुरू राहणार असून, आणखी दोन दिवस इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. हिंसक घटनांप्रकरणी मंगळवारी सकाळपर्यंत एकूण 188 आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
शहरात 12 आणि 13 नोव्हेंबरला एकापाठोपाठ एक अनेक हिंसक घटना घडल्या होत्या मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. भाजपने पुकारलेल्या बंदमध्ये दुकानांवर दगडफेक करण्यात आली होती. याच्या एक दिवस आधीही एका मुस्लिम संघटनेच्या रॅलीत दगडफेक झाली होती. त्रिपुरातील कथित जातीय हिंसाचाराच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनेने रॅली काढली होती. अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हे निर्बंध शिथिल करून कायम राहतील. अमरावती पोलिसांनी शनिवारी चार दिवस संचारबंदी लागू केली होती.
सिंग म्हणाले, ‘आम्ही कर्फ्यूमध्ये शिथिलता आणत आहोत, परंतु सध्या तो पूर्णपणे हटवला जाणार नाही. पुढील आठवड्यापर्यंत कर्फ्यू सुरू राहणार आहे.’ लोकांच्या हालचालींवर किती काळ बंदी घालण्यात येईल याची कोणतीही विशिष्ट तारीख त्यांनी दिली नाही. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इंटरनेट सेवा आणखी काही दिवस बंद राहणार आहे. मंगळवारी पोलिसांनी दुपारी 2 ते 4 या वेळेत संचारबंदी शिथिल केली.
तपासासंदर्भात सिंग यांनी सांगितले की, 12-13 नोव्हेंबरच्या घटनांशी संबंधित आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. 11 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरच्या हिंसाचाराच्या संदर्भात 24 गुन्हे दाखल करण्यात आले असून मंगळवारी सकाळपर्यंत एकूण 188 जणांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा: अमरावती हिंसाचार प्रकरणातील 5 मोठ्या घटना, संचारबंदी, इंटरनेट, अटक आणि जामीन याविषयी घ्या जाणून)
13 नोव्हेंबरच्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी सोमवारी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे आणि अन्य 13 जणांना अटक केली. बोंडे यांच्याशिवाय अमरावती भाजपच्या अध्यक्षा निवेदिता चौधरी, नगराध्यक्ष चेतन गावंडे आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.