अमरावती हिंसाचार (Amravati Violence) प्रकरणात पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, अमरावती (Amravati) शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी (Amravati Curfew) सलग चौथ्या दिवशीही कायम आहे. खंडीत करण्यात आलेली इंटरनेट (Internet) सेवा काळ पुढील 24 तासांसाठी आणखी वाढविण्यात आला. हा कालावधी संपल्यावर आज दुपारपासून इंटरनेट सेवा पूर्ववत होऊ शकेल, अशी माहिती आहे. मात्र, गरज पडल्यास इंटरनेट सेवा बंध ठेवण्याचा कालावधी वाढूही शकतो. अमरावती हिंसाचार प्रकरणात भाजपचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde Arrest) यांच्यासह 12 जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना न्यायालयाने जामीन दिला.
अटक आणि जामीन मिळालेले प्रमुख भाजप नेते
- अनिल बोंडे- भाजप नेते, माजी मंत्री
- शिवराय कुलकर्णी- भाजप प्रवक्ते
- चेतन गावंडे- महापौर
- तुषार भारतीय- भाजप गटनेता
- निवेदिता चौधरी- भाजप जिल्हाध्यक्षा
किरीट सोमय्या यांना प्रतिबंध
भाजप नेते किरीट सोमय्या हे अमरावती हिंसाचारानंतर अमरावती शहराचा आणि दंगलग्रस्त भागाचा दौरा करणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना प्रतिबंद केला आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे. पोलीस आयुक्तांनी पाठवलेल्या पत्राची प्रत जोडत सोमय्या यांनी ट्विट केले आहे की, "आता ठाकरे सरकारने माझ्या उद्याच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे." (हेही वाचा, Amravati Violence: अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण, जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड )
आरोप-प्रत्यारोप
अमरावती, नांदेड आणि मालेगावात येथे झालेल्या दंगल आणि हिंसाचार प्रकरणावरुन जोरदार राजकारण पेटले आहे. महाविकासआघाडीतील नेत्यांनी या प्रकरणात भाजपवर जोरदार आरोप केले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले आहे की, अमरावतीमध्ये रझा आकादमीची ताकद फारच मर्यादित आहे. ते मोर्चा, आंदोलन मोठ्या प्रमाणावर करु शकत नाहीत. त्यांना भाजपने फूस लावली असून, रझा अकादमी ही भाजपच्याच पाठींब्यावर चालते. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, राज्यातील महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने कट करुन दंगल भडकवली. यासाठी मोठे षडयंत्र रचले आहे. यात अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचा समावेश असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.