'दादा आनंद आहे. बऱ्याच दिवसांनी तुम्ही योग्य जागेवर बसला आहात. पण या ठिकाणी बसायला आपण खूप उशीर केला', असे सूचक विधान केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह ( Amit Shah) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना उद्देशून केले आहे. ‘सहकारातून समृद्धी’ संकल्पनेअंतर्गत केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाने संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानिमित्त ते पुणे येथे बोलत होते. अमति शाह यांनी केलेल्या सूचक विधानाचे राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जाणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर लटकत असलेले अपात्रतेची तलवार, त्यामुळे शिंदे गटात असलेली धागधुक आणि या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून सातत्याने केला जाणारा उल्लेख. या पार्श्वभूमीवर शाह यांच्या विधानाला महत्त्व आहे.

अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, महाराष्ट्र हे सहकार चळवळीचे केंद्र आहे. सहकार चळवळीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सहकार संस्थेच्या निवडणुकीत आता गैरप्रकार होणार नाहीत. आता कोणालाही आपल्या नात्यातील, जवळच्या व्यक्तीला सहकारी संस्थेत नोकरीला लावता येणार नाही. त्यासाठी आवश्यक असलेली पारदर्शकता ठेवणारी प्रणाली विकसीत केली आहे. सरकारी संस्थेचा एक राष्ट्रव्यापी डेटा तयार केला जातो आहे. ज्यामुळे गावागावांमध्ये असलेल्या सहकारी संस्थांची माहिती देशभरातील कोणत्याही नागरिकाला मिळू शकते. कोणत्या गावात सहकारी संस्था आहे यासोबतच कोणत्या गावात ही संस्था नाही, याचीही माहिती या डेटाच्या माध्यमातून मिळणार असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून राज्यातील सरकारी साखर कारखानदारीला प्रोत्साहन दिले जाईल. पारदर्शकतेशिवाय सहकार क्षेत्र चालू शकत नाही. म्हणूनच सहकारी संस्था, निवडणुकीत आता गैरप्रकार करता येणार नाहीत, असे अमित शाह म्हणाले. देशातील एकूण सहकारी संस्थांपैकी 42% संस्था या केवळ एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी असल्याचेही ते म्हणाले.