Akola Zilla Parishad President Election 2020: अकोला जिल्हा परिषदेत  प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे महाविकासआघाडीचा स्वप्नभंग; भाजपची भारीपला अप्रत्यक्ष मदत
Akola Zilla Parishad | (File Photo)

प्रकाश आंबेडर (Prakash Ambedkar) यांच्यामुळे अकोला जिल्हा परिषद (Akola Zilla Parishad) अध्यक्षपदावर झेंडा फडकवण्याचे महाविकासआघाडीचे स्वप्न भंगले आहे. महाविकासआघाडीला सत्तेपासून दूर ठेवणयासाठी प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघास भाजपचीही अप्रत्यक्ष मदत झाल्याचे पाहायला मिळाले. गेली 20 वर्षे प्रकाश आंबेडकर अकोला जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेऊन आहेत. या विजयाने त्यांनी पुन्हा एका ही परंपरा कायम ठेवली आहे.

अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भारिप-बमसं उमेदवार प्रतिभा भोजने यांची अध्यक्षपदी तर, सावित्री राठोड या उपध्यक्षपदी निवडूण आल्या. भारतीय जनता पक्षाचे सात सदस्य मतदानावेळी सभागृहाबाहेर निघून गेले. भाजप सदस्य मतदानावेळी अनुपस्थीत राहिल्याने अप्रत्यक्षपणे भारिप-बमसंला मदत झाल्याची चर्चा रंगली आहे.

अकोला जिल्हा परिषदेत एकूण 53 इतकी सदस्य संख्या आहे. पक्षीय बलाबल ध्यानात घेता प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बमसं सर्वाधिक 23 सदस्य आहेत. शिवसेना-13, काँग्रेस- 4, राष्ट्रवादी काँग्रेस -4, राष्ट्रवादी काँग्रेस-3 सदस्य आहेत. दोन अपक्ष सदस्यांनीही भारिप-बमसंला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारिप-बमसंची सदस्यसंख्या 25 वर पोहोचली होती. बहुमतासाठी 28 हा आकडा आवश्यक होता.

भारिपला सत्तेतून बाहेर ठेवत प्रकाश आंबेडकर यांना धक्का देण्यासाठी महाविकसआघाडी आणि भाजप एकत्र येण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी चर्चेच्या फेऱ्याही अनेक झाल्या. परंतू, त्यात यश न आल्याने हा प्रयोग बारगळला. अखेर भाजपने मतदान प्रक्रियेत सहभागी न होता अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, Legislative Council Election 2020: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय दौंड विधानपरिषदेवर बिनविरोध, भाजपच्या राजन तेली यांचा अर्ज मागे)

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी सुनिल धाबेकर यांनी काँग्रेसकडून तर, उपाध्यक्ष पदासाठी गोपाल दातकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता. भारिप-बमसंकडून अध्यक्षपदासाठी प्रतिभा भोजने आणि उपाध्यक्षपदासाठी सावित्री राठोड हे रिंगणात होते. प्रत्यक्ष मतदानाचा निकाल आला तेव्हा भारिपचे दोन्ही उमेदवार 25 विरुद्ध 21अशा फरकाने विजयी झाले.