अकोला: फेसबुकवरुन सेवानिवृत्त व्यक्तीला 57 लाखांना लुटलं; 25 कोटींचं आमिष पडलं महागात
Online Fraud (Image: PTI/Representational)

फेसबूक(Facebook) वर फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवून मैत्री केली. त्यानंतर 25 कोटी रुपयांचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या खात्यातून 57 लाख रुपये लुबाडण्याची घटना अकोला येथून समोर येत आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एका नायझेरियन व्यक्तीला अटक केली आहे. आत्माराम रामभाऊ शिंदे (67) असे या सेवानिवृत्त व्यक्तीचे नाव आहे. ते आरोग्य विभागातून विस्तार अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. (Online Fraud in Pune: ज्वेलर असल्याचे भासवून फ्रॉडरकडून दाम्पत्याची 1.22 लाखांना फसवणूक)

7 मे 2021 रोजी त्यांच्या त्यांच्या फेसबूकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारल्यानंतर त्यांच्यात संवाद सुरु झाला. पलिकडील व्यक्तीने आपण अमेरिकन सैनिक असल्याचे सांगितले. तसंच सिरियामध्ये काम करीत असताना त्याला एक बॉक्स सापडला असून त्यात अमेरिकन डॉलर्स होते. ते त्यांनी तिघात वाटून घेतले. त्यावेळी त्यांच्या वाटेला 3.5 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे तब्बल 25 कोटी रुपये आले.

मात्र ही रक्कम अमेरिकेत घेऊन जावू शकत नाही. त्यामुळे ती रक्कम तुम्हाला भारतात पाठवतो. त्यातील 30 टक्के रक्कम शिंदेंना देण्याचे त्याने कबुल केले. त्यासाठी त्याने आत्माराम शिंदे यांच्याकडे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्र., ई-मेल, जवळील एअरपोर्ट याबाबत डिटेल माहिती मागितली. शिंदेंनी ती माहिती आरोपीला दिली. त्यानंतर एँन्थोनी नावाचा एजन्ट नागपूर येथे पैसे घेऊन येणार आहे. आल्यानंतर तो तुम्हाला फोन करेल त्याच्या सुचनेनुसार काम करा, असेही त्याने शिंदे यांना सांगितले.

12 मे रोजी सकाळी अशोक नावाच्या व्यक्तीने शिंदे यांना कॉल केला. त्याने दिल्ली एअरपोर्टवर अँन्थोनी तुमचे पार्सल घेऊन आला असल्याचे सांगितले. त्यासाठी तुम्हाल कस्टम ड्युटी भरावी लागेल, असे सांगून सुरुवातील शिंदेंकडे 74 हजार 999 रुपयांची मागणी केली. शिंदे यांनी पैसे पाठवले. त्यानंतर तब्बल 22 वेळा शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी झाली. त्यात एकूण 56 लाख 60 हजार 998 रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले.

मात्र तरी देखील पैशांची मागणी सुरु राहिल्याने फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका नायझेरीयन नागरिकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. 25 कोटींचे आमिष शिंदे यांना चांगलेच महागात पडले आहे. पैसे पाठवण्यासाठी त्यांनी स्वकमाईतून घेतलेले 3 प्लॉट्स विकले.