बायकोला माहेरी घेऊन गेलेल्या पतीची पूर्व प्रियकराकडून हत्या; अकोला येथील धक्कादायक प्रकार
Crime | (Photo Credits: PixaBay)

रक्षाबंधनासाठी बायकोला माहेरी घेऊन गेलेल्या एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना अकोला (Akola) येथून समोर येत आहे. बायकोच्या पूर्वीच्या प्रियकराने तरुणाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीसह त्याच्या चुलत भावाला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयानं सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. महेश दत्तात्रय चव्हाण असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. (पुणे: प्रियकराने थाटला दुसऱ्याच मुलीशी संसार; प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या)

महेश रक्षाबंधनानिमित्त आपल्या बायकोला घेऊन सासुरवाडीला म्हणजेच अकोले येथे गेला होता. रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी 23 ऑगस्ट रोजी महेश याची भालदवाडी-अकोले गावच्या शिवारात धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या करण्यात आली. हत्येची घटना उघडकीस येताच भिगवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. (Pune: पुण्यात नवविवाहितेचा राहत्या घरात आढळला मृतदेह; हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरु)

तपासादरम्यान महेशच्या पत्नीचं माहेरी घराशेजारी राहणाऱ्या अनिकेत शिंदे नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. मात्र सुरुवातील उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या अनिकेतने नंतर गुन्हा कबुल केला.

महेश याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र प्रेयसीला भेटण्यास महेशचा अडथळा येत होता. त्यामुळे त्याच्याबद्दल मनांत प्रचंड राग होता. तो सासुरवाडीला येणार याची माहिती मिळताच चुलत भाऊ गणेश शिंदे याच्या मदतीने महेशची हत्या केली, असे अनिकेतने पोलिस चौकशीदरम्यान सांगितले.