'सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही आले नाही, उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) तुम्हीही नाही', असे म्हणत महाविकासाघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar on Raj Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सत्तेच्या ताम्रपटाबद्दल उल्लेख होता. या वरुन प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार (Ajit Pawar) सांगली येथे बोलत होते. सत्तेचा ताम्रपट हे कोणीही घेऊन येत नाही. हे जगातील प्रत्येकालाच माहिती आहे. आम्हीही नेहमी हेच म्हणत असतो. आम्हालाही सगळ्यांना हे माहिती आहे. कालच मी माझ्या एका सभेमध्येही हे बोलून दाखवले आहे, असा टोला अजित पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
सत्तेचा ताम्रपट कोणी घेऊन येत नाही. हे जसे खरे तसे लोकशाहीमध्ये महाराष्ट्रात 145 आमदार जी व्यक्ती स्वत:च्या पाठीशी उभी करु शकते ती मुख्यमंत्री होते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने इतके संख्याबळ निर्माण केले तर तर तोच मुख्यमंत्री होणार हेच त्रिवार सत्य आहे. त्यामुळे कोणीजरी सांगितले की, मुख्यमंत्री आमक्यातमक्याने व्हावे तरी त्यात बदल होत नाही. आता मत व्यक्त करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे त्याला नाकारण्याचे कोणीच कारण नाही. परंतू, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला सतर्क केले जाते. तसेच, ते काम करत असताना अल्टीमेटम देतात. हे बरोबर नाही अशी नाराजीही अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल बोलून दाखवली. (हेही वाचा, Raj Thackeray Ayodhya Visit: भाजपामध्ये दोन प्रवाह, एकीकडे MP Brij Bhushan Sharan Singh चा विरोध असताना MP Lallu Singh स्वागताला सज्ज)
सध्याचे सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे. या आधी देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे यांच्यासारख्या मान्यवरांच्याही नेतृत्वाखाली महाराष्ट्रत सरकार होते. राज्यकारभार करण्यासाठी सत्तेवर कोणीही असले तरी त्या नेतृत्वाला संविधानाच्या, कायद्याच्या, नियमाच्या बाहेर जाऊन कोणतेच काम करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारला काम करत असताना कोणी अल्टीमेटम देत असेल तर ती भाषा हुकुमशाहीची आहे. लोकशाहीत तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे याचा अर्थ तुम्ही काहीही बोलावे, सरकारलाच मुदत द्यावी, असे होत नाही, असेही अजित पवार म्हणाले.