एअर इंडिया (Air India) कंपनीसोबत काम करणारी सृष्टी तुली (Srishti Tuli Case) नावाची 25 वर्षीय एक महिला पायलट मृतावस्थेत (Air India Pilot ) आढळली आहे. मुंबई येथील अंधेरी परिसरातील मरोळ भागात ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्या फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य पंडित (Aditya Pandit Arrest) या 27 वर्षीय तरुणास भारतीय न्याय संहिता कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
डेटा केबलच्या सहाय्याने गळफास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा मृतदेह तिच्या कनाकिया रेनफॉरेस्ट इमारतीतील निवासस्थानी सापडला. जिथे तिने डेटा केबलचा वापर करून गळफास घेतला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. तुलीच्या काकांनी दाखल केलेल्या औपचारिक तक्रारीत, तिचा प्रियकर पंडित याच्यावर छळ आणि गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या छळामुळे तुली आत्महत्येस प्रवृत्त झाली आणि तिने कठोर पाऊल उचलले. तक्रारीत पुढे असा दावा करण्यात आला आहे की, पंडित याने पीडितेला मांसाहार सोडण्यासही भाग पाडले. (हेही वाचा, Cockroach Finds in Air India Food: एअर इंडियाच्या विमानामध्ये अन्नात आढळले झुरळ; अभिनेते अनुपम खेर यांनी निष्काळजीपणावर उपस्थित केले प्रश्न)
पायलट अभ्यासक्रम शिकताना जुळले प्रेमसंबंध
सृष्टी तुली मूळची उत्तर प्रदेशचा रहिवासी असून जून 2023 पासून मुंबईत राहत होती, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले. दोन वर्षांपूर्वी दिल्लीत व्यावसायिक पायलट अभ्यासक्रम करत असताना तिची आणि पंडीतची भेट झाली. ज्यामुळे तिचे प्रेमसंबंध जुळले. पंडित याला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर कथित आत्महत्या प्रकरणाशी पोलीस संबंधित परिस्थितीचा तपशीलवार तपास करत आहेत. (हेही वाचा, Bizarre Bank Policy: जपानी बँकेचे अजब धोरण; कर्मचाऱ्याने फसवणूक केल्यास करावी लागेल आत्महत्या)
मदत आणि समुपदेशन
दरम्यान, कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचे पाऊल उचलणे गुन्हा आहे. योग्य समुपदेशन मिळाल्यास आत्महत्या टाळता येऊ शकते. त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार मदतही पुरवते. अनेक स्वयंसेवी संस्थाही मदत देऊ करतात. त्यामुळे कोणतीही गरजू व्यक्ती खालील हेल्पलाईनवर संपर्क साधू शकतातः
वंड्रेवाला फाऊंडेशन फॉर मेंटल हेल्थः 9999666555 किंवा help@vandrevalafoundation.com
TISS iCall: 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी मानसिक संघर्ष करत असाल, आणि तुम्हास मदतीची गरज असलेल तर तुम्ही इथे दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवू शकता. योग्य वेळी मिळालेले मार्गदर्शन आणि समुपदेशन नैराश्येत असलेल्या आणि आत्महत्येच्या विचारात असलेल्या अनेकांचे आयुष्य वाचवू शकते.