
'आवाज वाढव डीजे..' (Awaaz Vadhav Dj) असे म्हणत डिजेवाल्याला आईची शपथ घालणाऱ्यांची आणि डिजेच्या (DJ) तालावर थिरकणाऱ्यांचीही कमी नाही. असे असले तरी डीजेचा प्रमाणाबाहेर जाणारा आवाज अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करु शकतो अशा काही घटना अलिकडे पुढे येत आहेत. डीजेच्या आवाजाने तरुणाच्या कानाचे दोन्ही पडदे फाटल्याची घटना नुकतीच ताजी असताना आता एका शिक्षकाला डीजेच्या आवाजामुळे प्राण गमवावे लागल्याचे समजते. होय, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदे (Shrigonda) तालुक्यात ही घटना घडली आहे.
श्रीगोंदे तालुक्यात पेशाने शिक्षक असलेल्या अशोक बाबूराव खंडागळे यांच्यासोबत ही घटना घडली आहे. सांगितले जात आहे की, गावातील तरुणांनी हनुमान जयंती निमित्त डीजे आणला होता. या डीजेचा आवाज इतका तीव्र होता की, तो अशोक बाबूराव खंडागळे यांना सहन झाला नाही. परिणामी ते कोमात गेले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, महिनाभर उपचार गेऊनही ते पुन्हा शुद्धीत आले नाहीत. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ते 58 वर्षांचे होते. खंडागळे यांचा मृत्यू डीजेच्या आवाजानेच झाला असा सिद्ध करता येण्यासारखा पुरावा नसला तरी, त्या आवाजादरम्यानच ते कोमात गेले होते. त्यामुळे खंडागळे यांच्या निधनाला डीजेचा आवाजच निमित्त ठरल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. (हेही वाचा, UP Shocker: होळीच्या वेळी डीजेवर नाचताना तरुणाला आला हृदयविकाराचा झटका; झाला मृत्यू)
अशोक बाबूराव खंडागळे हे पेशाने शिक्षक असले तरी त्यांचा सामाजिक कार्यातही मोठा वाटा होता. ते श्रीगोंदा येथील आश्रमाचे केंद्रप्रमुख म्हणूनही ते काम पाहात होते. दरम्यान, हनुमान जयंती दिवशी ते कर्जत तालुक्यातील कौडाने गावाला गेले होते. या गावातील तरुणांनी हनुमान जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीसाठी डीजे मागवला होता. डीजेच्या जवळून जाताना आवाज सहन न झाल्याने ते जागेवरच कोसळले आणि कोमात गेले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन मोठ्या दवाखन्यात न्यायला सांगितले. दरम्यान,श्रीगोंदा येथील मोठ्या दवाखान्यत महिनाभर उपचार करुनही त्यांची प्रकृती सुधारली नाही. आवाजाच्या त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला होता. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.