प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

ठाणे आणि नवी मुंबई येथे सायकल योजना लागू झाल्यानंतर आता या निर्णयाच्या पावलावर पाऊल टाकत, मुंबई महानगरपालिका (BMC) पर्यावरणपूरक सायकल भाड्याने देण्याची सेवा सुरू करत आहे. एका खासगी एजन्सीच्या सहकार्याने सायकल-ऑन-हायर स्टॅन्ड्स स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचा वाढता खर्च तसेच निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या यावर सायकल हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे लवकरच मुंबई महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन, बस स्टॉप आणि महत्वाचे व्यवसाय असणाऱ्या परिसरात या सायकल्स उपलब्ध होतील. कमीत कमी अंतरासाठी तरी नागरिकांनी ग्रीन व्हील्सचा वापर करावा म्हणून बीएमसी हा उपक्रम राबवणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशाने सर्वप्रथम उपयुक्त असणारे अ‍ॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. तुमचा प्रवास सुरु करण्याआधी तुम्हाला प्रथम पैसे भरावे लागतील आणि त्यानंतर प्रवास संपल्यावर जवळच्या सायकल स्टँडवर तुम्ही ही सायकल ठेऊन देऊ शकता. पालिकेला हा प्रकल्प राबविण्यात मदत करणार्‍या खासगी एजन्सीने स्टँडच्या संभाव्य जागांसाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra-Kurla Complex) जवळ काम सुरू केले आहे. याबाबत नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या सायकल्स शेअर ऑटोच्या तुलनेत कमी दरात उपलब्ध असणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटीसाठी त्यांचा वापर केला जाईल. (हेही वाचा: पॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक)

पर्यावरणाला अनुकूल आणि तब्येतीसाठी निरोगी ठरत असल्याने अनेक देशांमध्ये सायकल-ऑन-हायर किंवा पब्लिक बाइकिंग ही एक यशस्वी संकल्पना आहे. आव्हाने असूनही, नवी मुंबईत येथे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच झाल्यापासून हा उपक्रम यशस्वी झाला आहे. नऊ महिन्यांत, नागरी संस्थेने सायकल स्थानकांमध्ये अनेक पटींनी वाढ करून 2.3 लाखांचा प्रवास घडवला आहे. परंतु ठाण्यात या योजनेला तितकेसे यश मिळाले नाही. ही योजना लागू झाल्यापासून जवळपास दोन वर्षांत, 500 सायकल्सपैकी अनेक सायकली दिवसातून दोनवेळपेक्षा जास्त वापरल्या जात नाहीत. आता हीच योजना मुंबई परिसरात किती यशस्वी होईल ते लवकरच समजेल.