
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केल्यानंतर देशमुखांचे मंत्रीपद गेले आणि चौकश्यांचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला आहे. या खंडणी वसुलीमध्ये आधी सीबीआय आणि आता ईडी च्या चौकशीला अनिल देशमुखांना सामोरे जावं लागणार आहे. Money Laundering प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने (ED) सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने (CBI)त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता सीबीआयच्याच एफआयआर वरून ईडी ने देखील चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. (Anil Deshmukh यांना मुंबई हायकोर्टाकडून झटका; सीबीआयच्या FIR ला आव्हान देणारी याचिका फेटाळली).
अनिल देशमुख यांच्याविरोधात दिल्लीत 100 वसुली आरोपांची प्राथमिक तपास करताना सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. न्यायधीश एस.एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे याच आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच आता ईडीने देखील गुन्हा दाखल केला आहे.
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या लेटरमध्ये अनिल देशमुखांवर पोलिस कर्मचारी सचिन वाझे आणि त्यांच्या सहकार्यांना मुंबईत विविध रेस्टॉरंट आणि बार मध्ये जाऊन महिन्याकाठी 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप लावला आहे. तसेच पोलिस दलात बदल्यांसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.