Thane: अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी ठाण्यातील विशेष न्यायालयाने एका नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विशेष POCSO न्यायाधीश व्ही व्ही विरकर यांनी आरोपीला लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आणि प्रत्येक गुन्ह्यात त्याला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपी मोहम्मद इस्लामला एकाच वेळी 20 वर्षांची दोन्ही शिक्षा भोगावी लागणार आहे. न्यायालयाने आरोपीला 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिवाय, वसूलीनंतरची संपूर्ण रक्कम पीडितेला भरपाईपोटी देण्याचे आदेश न्यायालयाने आरोपीला दिले आहेत. (हेही वाचा -Mumbai Ertiga Car Accident: भरधाव वेगातील इर्टिगा कार खांबावर आदळून 2 तुकडे; कुर्ला मधील SCLR पुलावरील घटना)
विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. पीडित मुलगी ही केवळ 13 वर्षांची आहे. पीडितेने शाळा सोडून दिली असून ती तिच्या आईला त्यांच्या किराणा दुकानात मदत करत होती. आरोपी वारंवार दुकानात यायचा आणि मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचा, असं फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, एप्रिल 2018 मध्ये, आरोपीने मुलीला आमिष दाखवून दुकानाजवळ एका निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. हा अत्याचार वारंवार सुरूचं राहिला. मे 2019 मध्ये पीडित मुलगी गरोदर राहिली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले आहेत.