Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) मुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) मध्ये तर अशा कोरोनाच्या टेस्टिंगसाठी सरकार अनेक उपक्रम राबवत आहे. मात्र आता कोरोना विषाणू चाचणीबाबत एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या अर्ध्याहून अधिक लोकांची प्रतिपिंडाची चाचणी (Antigen Test) सुरुवातीस नकारात्मक आली, मात्र नंतर रिअलटाइम पीसीआर पद्धतीने (Realtime PCR Method) ती सकारात्मक आल्याचे आढळून आले आहे. मुंबईमधील दोन मुख्य नागरी प्रयोगशाळांमधील निष्कर्षात हे उघडकीस आले आहे.

बीएमसीच्या (BMC) ‘मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग’ योजनेंतर्गत या महिन्यापासून सुरू झालेल्या जलद प्रतिरोध चाचणीमध्ये (Rapid Antigen Testing) असे चुकीचे अनेक अहवाल दिसत आहेत. उदाहरणार्थ, नायर हॉस्पिटलमध्ये अँटीजेन चाचणींमध्ये नकारात्मक रिपोर्ट आलेल्या 538 पैकी 60 टक्के रुगांची, आरटीपीसीआर अंतर्गत चाचणी केली असता ती सकारात्मक आली आहे. या महिन्याच्या सुरूवातीपासूनच पालिकेने सुमारे 8,872२ अँटीजेन चाचण्या एकत्रितपणे केल्या आहेत आणि त्यापैकी 1,152 लोकांची चाचणी सकारात्मक आली आहे. (हेही वाचा: मुंबईमध्ये आज 1,257 कोरोना विषाणू रुग्णांची व 55 मृत्यूंची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,05,829 वर)

त्यापैकी, खुद्द बीएमसीच्याच दोन रुग्णालयांनी नकारात्मक चाचणी आलेल्या अँटीजेन नमुन्यांचे, आरटी-पीसीआर चाचणींमध्ये 60-65 टक्के रिझल्ट सकारात्मक आल्याचे सांगितले आहे. कस्तुरबा रुग्णालयाच्या आण्विक निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. जयंती शास्त्री म्हणाल्या, रूग्णांमधील रोगनिदानविषयक खोट्या नकारात्मक अहवालांचे प्रमाण जास्त असल्याचे कारण, हे किट साहित्यातील अँटीजेन चाचणीची संवेदनशीलता 50 टक्के असणे हे आहे. चाचणीची संवेदनशीलता ही रोग असलेल्यांना योग्य प्रकारे ओळखण्यास मदत करते.

जेव्हा मार्चमध्ये भारतात कोरोना विषाणूचे आगमन झाले तेव्हा, रीयल-टाइम पॉलिमरेझ चेन रिएक्शन (RT-PCR) ही एकमात्र चाचणी होती. यामध्ये नाक आणि घशातून नमुने घेतले जात असत व त्यांचे निदान सहा ते आठ तासात होत असे. अजूनही आरटी-पीसीआर सर्वात कार्यक्षम चाचणी मानली जाते. परंतु अँटीजेन चाचण्यासारख्या नवीन पद्धती 15 ते 30 मिनिटांत रुग्णांचे निदान करतात. मात्र आता अशा चाचण्यांच्या रिझल्ट बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.