मुंबईच्या विमानतळावर दिसले 'Adani Airport' नावाचे फलक; संतप्त शिवसैनिकांनी केली जोरदार तोडफोड (Watch Video)
Adani Airport Board (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) सोमवारी शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या विमानतळाचे कामकाज आता अदानी समूहाच्या (Adani Group) हातात आहे. अडाणी समूहाने विमानतळावर त्यांच्या नावाचे बोर्ड लावले आहेत. त्यामुळे संतप्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर लावलेल्या 'अदानी विमानतळा'च्या (Adani Airport) फलकाचे नुकसान केले. गौतम अदानीच्या अदानी समूहाला मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन मिळाल्यानंतर अदानीचे नाव बोर्डावर लावण्यात आले, परंतु शिवसैनिकांनी विरोध केला आणि बोर्ड काढून टाकला.

शिवसेनेचा आरोप आहे की पूर्वी हे विमानतळ 'छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ' म्हणून ओळखले जात होते, परंतु आता येथे अदानी विमानतळाचा बोर्ड लावण्यात आला आहे. ही गोष्ट ते सहन करू शकणार नाहीत. अदानी समूहाने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची कमान आपल्या हाती घेतली होती, ज्याचे व्यवस्थापन यापूर्वी जीव्हीके ग्रुपकडे होते. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा घेण्याची घोषणा केली होती. आता विमानतळाचे व्यवस्थापन आपल्या हाती आल्यानंतर अडाणी समूहाने तिथे आपल्या नावाचा बोर्ड लावला होता, ज्याला शिवसेनाचा विरोध आहे.

जीव्हीकेप्रमाणेच अदानी कंपनीने देखील ‘मॅनेज्ड बाय अदानी एअरपोर्ट’ असा फलक लावाला, अशी मागणी यावेळी शिवसेनेनं केली. अन्यथा जिथे फलक दिसेल तिथे तोडफोड, करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. (हेही वाचा: Palghar: मित्रांसोबत फ्रेन्डशिप डे साजरा करायला गेलेल्या एका मुलाचा धरणात बुडून मृत्यू)

दुसरीकडे, याबाबत ‘अदानींनी विमानतळ विकत घेतले आहे का? विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले असताना जाणुनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम का करत आहेत? कशासाठी?,’ अशी विचारणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. ‘हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ते काय अदानी एअरपोर्ट आहे का?’? अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.