Vasai-Virar: आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकातच तुटली; नातेवाईकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल
Representational Image (Photo credits: Unsplash.com)

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांना हादरून सोडले आहे. सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. या संकटकाळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहेत. तर, दुसरीकडे डॉक्टर, पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहे. याचदरम्यान, विरार पूर्व येथील बालाजी रुग्णालयात एका रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटला. यावर संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेतील बालाजी रुग्णालयात एक महिला आपली कोविड आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेली होती. दरम्यान, या महिलेची चाचणी करत असताना तिच्या नाकात स्टिक लुटली. यानंतर डॉक्टर पळून जात असल्याचे समजून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली. त्यानंतर डाक्टरांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात लोकसत्ताने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- मुंबईच्या संशोधक विद्यार्थ्यांनी कोरोना योद्ध्यांसाठी कल्पकतेने तयार केल्या हवेशीर पीपीई किट्स

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोनाने गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून भारतात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. तेव्हापासून देशातील वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना अटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. या काळात अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही कोरोनामुळे मृत्यू आहे. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. ज्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे.