अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सुमारे 90 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा सुधारीत अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात चालू असलेल्या सत्ता स्थापनेच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. परंतु, असे असले तरी राज्यपाल योग्य निर्णय घेऊन लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देतील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ओल्या दुष्काळामुळे राज्यातील पिकांचे सुमारे 3500 ते 4 हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - शेतकऱ्यांनो कधीही हक्काने हाक मारा, शिवसेना मदतीसाठी धावून येईल- उद्धव ठाकरे)
पश्चिम महाराष्ट्रात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील 4 लाख 12 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. याच महिन्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. तसेच ऑक्टोबर महिन्यातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत राज्यात तब्बल 54 लाख 88 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. अनेक गावात अजूनही शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करण्यात आलेला नाही. एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र पाहता पिकांच्या नुकसानीसाठी 4 हजार कोटींहून अधिक निधीची गरज लागणार आहे. सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टी व पावसामुळे 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या क्षेत्राचा समावेश पंचनाम्यामध्ये करण्यात आला आहे. राज्यातील पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडे अहवाल पाठवला जाईल. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपाल यासंदर्भात लवकरच निर्णय घेतील, असं एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने सांगितलं आहे.