शेतकऱ्यांची भेट घेताना उद्धव ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटला नाही. एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, तर दुसरीकडे अनेक शासकीय योजना बंद पडल्या आहेत. अशात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कोणीच वाली न उरल्याने, त्यांची परिस्थिती अजूनच खालावत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सातारा व सांगली विभागातील पिकांच्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी उद्धव साहेबांशी संवाद साधताना अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना धीर देताना ‘गरज लागल्यास हक्काने शिवसेनेना हाक मारा, आम्ही मदतीसाठी येऊ. तसेच लवकरच नुकसान भरपाईही मिळेल’ असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नेवारी मळा, आंबेगाव भागातील शेतीची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच त्यांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील, कातरखटाव भागातील ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतजमीनीलाही भेट दिली. यावेळी त्यांनी शेताकार्य्ना धीर दिला. हक्काने कधीही हाक मारा, शिवसेना मदतीसाठी येईल असे य्द्धाव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे शिवसेनेने दिलेले वचन आहे. शिवसेना वचनपुर्ती करणार याची खात्री बाळगा असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. (हेही वाचा: महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुंबई मध्ये शेतकर्‍यांचा एल्गार; आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात)

दुसरीकडे गुरुवार पासून शरद पवार सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि पिकांच्या नुकसानीची पहाणी केली आहे. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यंदा अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेतीचे बरेच नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर 20 दिवस उलटूनही राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. अशा परिस्थितीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केलेले ओला दुष्काळ दौरे कौतुकाचा विषय ठरत आहेत.