
मुंबईमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश देण्याच्या नावाखाली तब्बल 8 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती मिळत आहे. बनावट डी फार्मसी तसेच अन्य पदविकांसाठी प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या 692 विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. याबाबत राजस्थानच्या ओपीजेएस विद्यापिठाविरुद्ध ठाणे येथील कापुरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषोत्तम ताहिलरामानी (73) या व्यक्तीने न्यायालयामार्फत हा गुन्हा दाखल केला आहे. महत्वाचे म्हणजे ताहिलरामानी यांच्यावर विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्रे बनवून देण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2015 ते 2018 या कालावधीमध्ये कोणतीही अधिकृत मान्यता नसताना ओपीजेएस विद्यापिठामध्ये दीप पॅरामेडिकलच्या माध्यमातून, 692 विद्यर्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश शुल्क म्हणून या विद्यार्थ्यांकडून 8 कोटी 39 लाख रुपये घेण्यात आले. मात्र ऐनवेळी या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून दिले नाही. विद्यार्थ्यांची अशा प्रकारे फसवणूक केल्यामुळे ताहिलरामानी यांनी हा गुन्हा दाखल केला. यामध्ये जोगिन्दर सिंह, जितेंद्र कुमार यादव, दीपक पुरी आणि प्रिया जैन आदींविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, देशात बनावट प्रमाणपत्रे आणि त्याद्वारे व्यवसाय करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. ताहिलरामानी यांनी अनेकांना असे बनावट प्रमाणपत्र मिळवून दिले आहेत. आता त्यांच्यासह टोळीमधील इतर 17 जण व असे बनावट प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे व्यवसाय करणारे दुकानदार यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी प्रलंबित आहे. याधीही ताहिलरामानी यांच्याविरुद्ध दहावी आणि बारावीची बनावट प्रमाणपत्रे पुरवण्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.