Coronavirus: मुंबई मधील मीरा भाईंदर येथील रुग्णालयातील 56 रुग्णांना डिस्चार्ज
56 COVID19 patients discharged in Mira Bhayandar (PC - ANI)

महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये 700 पेक्षा जास्त जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशातच आता एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. आज मुंबईतील मीरा भाईंदर (Mira Bhayandar) येथील रुग्णालयातील 56 रुग्णांना डिस्चार्ज (Discharged) देण्यात आला आहे. या सर्वांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

राज्यात मुंबई शहर तसेच उपनगरात कोरोनाची हॉटस्पॉट ठिकाणं आहेत. या हॉटस्पॉट ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत धारावी, दादर, मीरा रोड, वसई-विरार, आदी ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये 751 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा - Lockdown च्या काळात राज्यात विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल; जाणून घ्या लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी केलेल्या विविध कारवायाविषयी)

दरम्यान, भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या 17 मे पर्यंत देशात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन सरकारने देशाची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये विभागणी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने 284 जिल्हे हे ऑरेंज झोन मध्ये तर 319 जिल्हे हे ग्रीन झोनमध्ये आणि 130 जिल्हे हे रेड झोन मध्ये असल्याचे जाहीर केले आहे.