MHADA Lottery: पुण्यातील म्हाडाच्या 5 हजार 863 घरांसाठी आजपासून अर्जविक्री, 18 ऑक्टोबरला सोडत
Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

म्हाडाच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणेकरांसाठी एक  आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन अर्जविक्री- स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. ऑनलाईन अर्जविक्री आणि स्विकृती ही 29 सप्टेंबरपर्यंत सुरु रहाणार आहे. 18 ऑक्टोबरला या म्हाडाच्या घरांची सोडत ही काढली जाणार आहे. मार्चमध्ये पुणे मंडळाने सुमारे 6 हजार घरांची सोडत काढली होती. यानंतर त्यांनी पुन्हा ही सोडत काढत अनेकांना आनंदाची बातमी ही दिली आहे. अनेक दिवसांपासून इच्छुकांना या सोडतीची प्रतीक्षा होती. (हेही वाचा - Electronics Manufacturing Cluster: रांजणगाव येथे उभा राहणार राज्यातील पहिला ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर' प्रकल्प; उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी, जाणून घ्या सविस्तर)

आज 12 वाजल्यापासून पुणे म्हाडा मंडळातील घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी 29 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. अनामत रक्कम ही प्रत्येक उत्पन्न गटासाठी ही वेगळी आहे. पात्र अर्जांची अंतिम यादी 16 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुण्यातील म्हाडाच्या कार्यालयात 18 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील  403, पीएमएवायमधील 431, 15 टक्के सामाजिक गृहयोजनेतील 344, म्हाडा गृहनिर्माण प्रथम प्राधान्य योजनेतील 2445 आणि 20 टक्क्यातील 2240 घरांचा यात समावेश आहे.