26/11 Mumbai Terror Attack Anniversary: वाचा फासावर लटकण्याआधी काय म्हणाला होता कसाब
अजमल कसाब

26/11 Mumbai Terror Attack Anniversary : 26 नोव्हेंबर 2008, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस. आजही या दिवसाची आठवण झाली तरी प्रत्येक मुंबईकराच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. या दिवशी मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला होता. 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह जवळजवळ 180 जण ठार झाले, तर तब्बल 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. व्यवस्थित कट रचून, समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश करून दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले केले. यामध्ये आठ हल्ले मुंबईचे वैभव असलेल्या छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. यापैकी या दहशतवाद्यांना कंठस्थान घालत 14 पोलिसांना वीरमरण आले. 9 दहशतवाद्यांचा खातमा केल्यानंतर जिवंत हाती लागला तो म्हणजे अजमल कसाब.

रमेश महाले यांनी सर्वप्रथम कसाबची चौकशी केली होती. ही चौकशी तब्बल 81 तास चालली होती. महालेंकडे स्वतःला वाचविण्यासाठी ढोंगी कसाबने मुंबईत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला पाहण्यासाठी आल्याचा दावा केला होता. “तीन दिवसांपूर्वी रॉने मला पकडले आणि 26/11 दहशतवादी हल्ल्यादरम्यान माझ्या जखमी झालो हे भासवण्यासाठी माझ्या हाताला गोळ्या झाडून जखमा करण्यात आल्या”, असे कसाबने सांगितले होते. मात्र त्याचा हा ढोंगी दावा फोल ठरला. शेवटी हार मानून कसाबसारख्या भयानक दहशतवाद्याने फासावर चढण्याआधी महालेंकडे ‘आप जीत गाये मैं हार गया’ अशी कबुली दिली होती. 21 नोव्हेंबर 2012 रोजी दहशतवादी अजमल अमीर कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. (हेही वाचा : उत्तर प्रदेश येथे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील 'कसाब'च्या नावाने निघाला रहिवासी दाखला)

कसाबला एकूण 80 गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण कोर्टाच्या सुनावणीदरम्यानही कसाब आपल्या गुन्ह्याबद्दल पश्चात्तापदग्ध दिसला नाही. उलट तो कोर्टातही चेष्टा मस्करीच करत असे, असे पोलिसांनी सांगितले. इन्स्पेक्टर रमेश महाले यांनी फाशीच्या दोन दिवस आधी कसाबची भेट घेतली होती, त्यावेळी कसाबने त्यांच्यासमोर आपला पराभव मान्य करून, 'मी हरलो, तुम्ही जिंकलात' असे सांगितले होते.