
मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी-आरोपी अजमल कसाब याला फाशी दिल्यानंतर सहा वर्षांनी, चक्क त्याचे रहिवास प्रमाणपत्र तयार करण्याचा पराक्रम उत्तर प्रदेशच्या औरैय्या जिल्ह्यातील बिधून तहसीलने केला आहे. हा प्रकार समोर येताच जिल्हा प्रशासनाकडून प्रमाणपत्र रद्द करत दोषी लेखापालाला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची त्वरित चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने चक्क कसाबचा फोटो लावून रहिवासी दाखला मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर लेखापालाने आपल्या अहवालासोबत ही फाईल पुढे सरकावली होती. त्यावर कोणत्याही गोष्टीची चौकशी न करता अथवा फोटो आणि नावाची तपासणी न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हे प्रमाणपत्र जारी केले.
या अर्जावर कसाबच्या फोटोसोबत वडिलांचे नाव मोहम्मद आमिर आणि आईचे नाव मुमताज बेगम असे लिहिले आहे. या अर्जाच्या नागरिकत्वाची कोणतीही तपासणी न करता हे रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले. या अर्जावर जिल्हा अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरीही करण्यात आली आहे.
कसाब हा 2008 साली झालेल्या मुंबई हल्ल्यातील पकडला गेलेला एकमेव जीवंत दहशतवादी होता. त्याला चार वर्षे येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते आणि नोव्हेंबर 2012 मध्य त्याला फाशी देण्यात आली होती.