महाविकासआघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन; पक्षश्रेष्ठींच्यासमोर 162 आमदारांनी घेतली एकनिष्ठ राहण्याची शपथ (Video)
महाविकासआघाडी आमदार (Photo Credit : ANI)

राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेस (NCP-ShivSena-Congress) पक्षांमध्ये सत्तास्थापनेची बोलणी चालू असताना, अजित पवार यांनी बंड केले व राष्ट्रवादीचे आमदार फोडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या घटनेनंतर महाविकासआघाडीने पुन्हा जुळवाजुळव करून सत्तास्थापनेच्या शर्यतीत आपले स्थान बळकट केले. आज तीनही पक्षांचे 162 आमदार प्रथमच एकत्र आले होते. या महासभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संबोधित केले. त्यानंतर सर्व आमदारांनी एकत्र राहण्याची शपथही घेतली.

यावेळी बोलताना, 'जो काही फोडाफोडीचा केविलवाणा प्रयत्न केला तो आणखी करा, म्हणजे आम्ही आणखी एकजूट होऊ', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. तर शरद पवारांनी (Sharad Pawar) नवीन आमदारांना सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका, तुमची जबाबदारी माझी वैयक्तिक आहे, व्हिपचा अधिकार पक्षातून बाजूला केलेल्याला नाही असे सांगत दिलासा दिला. भाजपकडून संसदीय नियम मोडले गेले आहेत, महाराष्ट्राचा दुसरा गोवा होऊ देणार नाही असेही शरद पवार म्हणाले. यावेळी सर्व आमदारांनी संविधानाला स्मरून, पक्षनेतृत्वाच्या समोर पक्षाविरोधात कोणतेही कृत्य करणार नाही, पक्षप्रमुख जे सांगतील ते आम्ही ऐकू, आम्ही सर्वजण एकत्र राहू अशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी ही शपथ दिली.

(हेही वाचा: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 162 सह्यांचं पत्र राज्यपालांना सादर करत मागितली सत्ता स्थापनेची संधी)

दुसरीकडे भाजपच्या आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडीच्या आजच्या बैठकीवर जोरदार टीका केली. फोटोग्राफार तुमचा, फोटो तुमचा मात्र याचे फिनिशिंग आम्हीच करू असे ते म्हणाले. आज ज्या पद्धतीने 162 आमदार एकत्र आले होते त्याला त्यांनी एक पोरखेळ असे नाव दिले. आज तिथे 145 आमदारही नव्हते असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजपने तोडफोडीचे राजकारण केले असा आरोप पक्षावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहचले असून उद्या सकाळी यावर सुनावणी पार पडणार आहे.